चीनच्या उत्तर भागात नव्याने आढळून येत असलेल्या H9N2 व्हायरसची प्रकरणे आणि श्वसनाच्या आजारासंबंधी झालेल्या उद्रेकावर भारत सरकार लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.
चीनमधून नोंदवलेले एव्हीयन इन्फ्लूएंझा प्रकरणे तसेच श्वसनाच्या आजाराच्या क्लस्टर्सपासून भारताला कमी धोका असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले आहे.
चीनमधील H9N2 संबंधी जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओने दखल घेतली आहे. या आजाराची माणसाला होत असलेली लागण आणि मृत्यूदर दोन्ही रेशो कमी आहेत. भारताच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे की, भारत सध्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. विशेषतः कोरोनानंतर देशाने आरोग्यविषयक पायाभूत सुविधा सज्ज केलेल्या असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.