भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचे लाभ लक्षीत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने संपूर्ण देशासह मुंबई शहर जिल्ह्यातही विकसित भारत संकल्प यात्रेच्या मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व विभागांनी त्यांच्या योजनांची प्रचार – प्रसिद्धीबरोबर नियोजन करुन लाभार्थ्यांची निवड व त्यांना प्रत्यक्षात लाभ मिळवून द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.
विकसित भारत संकल्प यात्रेच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या योजनांच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी पाच चित्ररथ उपलब्ध असणार आहेत. यामुळे विभागांना त्यांच्या योजनांच्या प्रचार प्रसारासाठी कोणताही खर्च न करता लोकांपर्यंत सहजपणे योजना पोहोचविता येतील. प्रत्येक विभागाने त्यांच्या कोणत्या योजना लाभार्थी केंद्रीत आहे याचे नियोजन करुन त्यासाठी प्रसार साहित्य तयार करावे. मुद्रित व ध्वनिचित्रफित अशा दोन्ही स्वरुपात हे साहित्य तयार ठेवावे.
यावेळी योजनांचा लाभ देण्यासाठी नवीन लाभार्थ्यांची नोंदणी आणि पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ वितरित करावा असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाने त्यांच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड वाटप करावे. मुंबई शहरात ६ लाख ४७ हजार लाभार्थी असून या मोहिमेच्या माध्यमातून हा लक्षांक पूर्ण करावा. कौशल्य विकास विभागाने त्यांच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरुन नोंदणी करून घ्यावी. तसेच इतर विभागांनी सुद्धा त्यांच्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या नोंदणी ते लाभ असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, मुंबई महानगर पालिकेचे सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी डॉ. उपलिमित्रा वाघमारे, कौशल्य विकास विभागाचे संदीप गायकवाड, पीएमजेएवायचे जिल्हा समन्वय अधिकारी धनराज पाटील व तहसीलदार आदेश डफळ उपस्थित होते.