सुप्तावस्थेतील स्त्रीशक्तीला पुनःजागृत करून नवचेतना आणण्यासाठी, आद्यसरसंघचालक पू. डॉ. हेडगेवारांकडून प्रेरणा घेऊन वंदनीय लक्ष्मीबाई तथा मावशी केळकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ‘राष्ट्र सेविका समिती’ ह्या स्त्रीसंघटनेची स्थापना केली.
अशा थोर ‘समिती संस्थापिका’ वंदनीय मावशी केळकर ह्यांचा आज स्मृतिदिन ! (२७ नोव्हेंबर १९७८)
त्यांना विनम्र आदरांजली !!
(वंदनीय मावशी केळकर ह्यांच्यावर श्री. अनिरुद्ध पांडे ह्यांचा खालील लेख ३१ मार्च २०१७ च्या नागपूर तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाला होता)
रामायणाचे दिवस !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय विचारांचे पुरुषांचे संघटन आहे. तसेच राष्ट्रसेविका समिती हे देशातील सर्वात मोठे महिलांचे संघटन आहे. संघ १९२५ च्या विजयादशमीपासून सुरू झाला. त्यानंतर अकरा वर्षांनी, १९३६ च्या विजयादशमीला समितीची स्थापना झाली. वर्धेच्या लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकरांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. संघात जसे सरसंघचालक, तशा समितीत प्रमुख संचालिका. समितीच्या पहिल्या प्रमुख संचालिका, म्हणजेच संस्थापक म्हणजे मावशी केळकर.
राष्ट्रीय दृष्टिकोनातून समाजाकडे पाहण्याची दृष्टी असलेल्या मावशींना समितीचे काम करतानाच रामायण अभ्यासण्याची आणि रामायणाच्या माध्यमातून स्त्रियांना एकत्र आणणार्या समितीच्या कामाचा विस्तार करण्याची प्रेरणा मिळाली. महात्मा गांधी आपल्या भाषणात या देशातील स्त्रियांना, ‘तुम्ही सीता बना’ असे आणि बहुतेक पुढारी, ‘आम्हाला रामराज्य आणायचे आहे’ असे सांगत. त्यातूनच रामाच्या वेळी राज्यव्यवस्था, समाजजीवन कसे होते याबद्दल उत्सुकता निर्माण होऊन मी रामायणाकडे वळले, असे मावशींनीच सांगितले आहे. रामायणाचा अभ्यास करणे त्या काळी बायकांसाठी कठीणच होते. रामायण, महाभारत, सप्तशती असे ग्रंथ ठेवल्यास घरात कलह माजतो अशी खुळी कल्पना त्या काळात रूढ होती. त्यामुळे रामायण वाचणे बायकांसाठी तरी कठीणच होते.
एखादी गोष्ट मनात ठरली की तिचा पाठपुरावा करण्याचा मावशी केळकरांचा स्वभाव होता. त्यातून त्यांनी रामायणाचा अभ्यास करण्याची सुरुवात करण्यासाठी त्यांना ‘रामविजय’ ही पोथी मिळवली. बायकांनी हे करू नये, ते करू नये यावर मावशींचा विश्वास नसल्यामुळे त्यांनी या पोथीचे वाचन करून अभ्यास केला. पण त्यातून त्यांचे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी ‘वाल्मीकि रामायण’ मिळवून त्याचा अभ्यास केला. सोबतच त्यांनी रामायणावरील मिळतील त्या पुस्तकांचे वाचन करणे सुरू केले. ‘रामायणामुळे घरात भांडणे होतील किंवा भांडणाला संधी मिळेल असे काहीच नाही. उलट समाजातील सर्व स्तरातील लोकांवर उत्तम संस्कार होतील अशीच व्यक्तिचित्रे व घटना रामायणात आहेत’, असे सांगून त्यांनी रामायण समजावून सांगण्याचा उपक्रम सुरू केला, १९५१ साली.
६६ वर्षांचा उपक्रम
स्त्रीच कुटुंबावर उत्तम संस्कार करू शकते. त्यामुळे ती सुसंस्कारित आणि प्रगल्भ असायला हवी. अशा स्त्रीलाच रामायणासारख्या उत्तम ग्रंथापासून वंचित का केल्या गेले हे कळत नाही. वेद किंवा रामायण, महाभारत काळात स्त्रीवर अशी बंधने नव्हती. अलीकडच्या गुलामगिरीच्या काळात ही बंधने लादल्या गेली असावीत, असे मावशी केळकरांचे मत झाले, रामायणाचा अभ्यास केल्यानंतर. महिलांना रामायण सांगितले पाहिजे असे त्यावेळच्या समितीच्या ज्येष्ठांचे मत झाले आणि प्रमुख संचालिका असलेल्या मावशींनी स्वत:च १९५१ मध्ये वर्धेत रामायण सांगायला सुरुवात केली. प्रारंभी त्याचे स्वरूप कीर्तनासारखे होते, गोष्ट आणि मधेमधे गाणी. त्यावेळचे राष्ट्रीय कीर्तनकार वा. शि. कोल्हटकर यांच्या ‘रामगीतसुधा’या पुस्तकाच्या आधारे हा कार्यक़्रम समितीतर्फे सादर केला जाई.
मावशी केळकरांनी स्वतंत्रपणे, कथारूप म्हणून एकटीने रामायण सांगायला सुरुवात केली १९५३ मध्ये. त्यावर्षी गुढीपाडवा ते रामनवमी हे नऊ दिवस रामायण सांगण्याच्या संकल्पाला सुरुवात झाली. त्यांच्या पहिल्या रामायणाला बारा महिला होत्या. पण त्या दिवसागणिक वाढत गेल्या. चार वर्ग शिकलेल्या मावशी काय सांगणार, ऐकून तर पाहू, असा विचार करून त्यांचे रामायण ऐकणारा प्रभावितच होऊन जात असे. वर्षाप्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत, नऊ दिवसांत दररोज एक तास याप्रमाणे नऊ तासांत संपूर्ण रामायण सांगण्याचा हा उपक्रम होता. तो मावशींनी सतत तेरा वर्षे राबविला.
या संकल्पपूर्तीच्या निमित्ताने मावशी केळकरांनी समिती सेविकांना नवीन उपक्रम दिला, गावोगाव रामायण सांगण्याचा. आपल्या महाभारत व रामायण या दोन जिव्हाळ्याच्या धर्मग्रंथांमध्ये रामायण अधिक जीवनस्पर्शी आहे. ते पुराण नसून तो इतिहास आहे. इतिहास हा वर्तमानाला मार्गदर्शक असतो. इतर रामायणांच्या तुलनेत वाल्मीकि रामायणात रामाला मानव मानले आहे. त्यात कोणतेही संकट झटपट, दैवी शक्तीने नाहीसे झालेले नाही. प्रयत्न, शौर्य, निराशा, उत्सुकता, यशापयश, मन:स्थिती, पत्नीप्रेम, बंधुप्रेम, विरह या सर्व मानवी भावना व जीवनाची अंगे त्यात आहेत. समाजापुढे राम मानव म्हणून उभा केला, तर लोक त्याला आदर्श मानून तसे आचरण करण्याचा प्रयत्न करतील. देव म्हणून उभे केल्यास त्याची पूजाच करतील, असे मावशी मानत.
त्यांचा हा संकल्प आज देशभर, गावोगाव, विविध वस्त्या आणि भाषांमध्ये अक्षरश: हजारो ठिकाणी सेविका पार पाडतात, निष्ठेने.
वंदनीय मावशी केळकर ह्यांना विनम्र अभिवादन !!!
साभार – इंटरनेट