फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा वारसा महाराष्ट्र सांगतो. या थोर समाजसुधारकांमुळे महाराष्ट्रास पुरोगामी म्हणून संबोधले जाते. त्यापैकी महात्मा फुलेंविषयी आज जाणुन घेऊ.
११ एप्रिल १८२७ रोजी महात्मा फुले यांचा जन्म पुणे येथे झाला. शेतकरी व बहुजन समाज यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी आपले कार्य केले. त्यांच्या कार्याचा चौफेर आढावा आपण घेऊ .
१ . भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठ भिडे वाडा येथे काढली .
२. स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन पहिली स्त्री शिक्षिका व प्रशिक्षित महिला मुख्याध्यापिका बनविले . सुमारे 150 वर्षांपूर्वी त्यांनी सावित्रीबाईंना असे तयार केले की ज्योतिबांच्या निधनानंतर अंतयात्रेपुढे टिटवेधरणे विषयी वाद निर्माण झाला असता स्वतः सावित्रीबाईंनी ते टिटवे धरले.अत्यंत सुधारित मताच्या सावित्रीबाई होण्यामागे ज्योतिबाच होते.
३. शूद्रांच्या शिक्षणाविषयीच्या कार्यामुळे त्यांना रहाते घर सोडावे लागले .महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. शुद्रांना शिकवण्यासाठी’ मंडळी ‘नामक संस्था काढली. प्रौढांसाठी 1955 ला भारतातील पहिली रात्र शाळा काढली.
४. बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे ; शिक्षक प्रशिक्षित असावेत ;बहुजन समाजाला शिक्षण क्षेत्रात सामावून घ्यावे ; शेतीचे तांत्रिक शिक्षण द्यावे अशा मागण्या हंटर कमिशन या शिक्षण विषयक कमिशन पुढे १८८२साली जोतिबांनी मांडल्या.प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत व्हावे असे म्हणणारे आशिया खंडातील ते पहिले शिक्षण तज्ञ होते. समाजापासून वंचित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात खेचून आणण्याचे महत्त्वाचे व मोलाचे काम ज्योतिबांनी केले.
५ . विधवा स्त्रियांच्या केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी तळेगाव ढमढेरे व ओतुर येथे न्हाव्यांचा एक दिवसीय संप घडवून आणला.
६. ८ मार्च १८६४ रोजी गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला.
७. बालहत्या प्रतिबंधक गृहाची आपल्या राहत्या घरात पुणे येथे स्थापना केली .भारतातील ते पहिले गृह आहे .पंढरपूर येथे देखील असे गृह काढले.
८. विधवेच्या हातून चूक घडली असता बालहत्येसारखे पाप घडते. त्यासाठी उचललेले हे खंबीर पाऊल होते .अशाच काशीबाईच्या मुलास दत्तक घेऊन यशवंत असे त्याचे नाव ठेवले .हा पुढे जाऊन डॉक्टर झाला .
९. व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना केली . दुष्काळ पीडित लोकांसाठी छावण्या देखील उभ्या केल्या.
१० . सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचे घोषवाक्य होते” सर्व साक्षी जगतपती |त्याला नकोच मध्यस्ती ||”त्यामुळे पुरोहितांचे कामच अमान्य झाले.
११. लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा सत्य धर्म असे त्यांचे धर्माविषयीचे मत होते. ‘सार्वजनिक सत्यधर्म ‘हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ म्हणून त्यांनी लिहिला .’दीन बंधू ‘नावाचे साप्ताहिक त्यांनी काढले .
१२. ‘गुलामगिरी’ ,’शेतकऱ्यांचा आसूड ‘यातून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग यावर विस्तृत लेखन केले. त्यामुळे समाज जागृती होऊन शोषण विरोधी कार्य करण्याची ताकद बहुजन समाजात आली.
१३. बालविवाह विरोध ,विधवा विवाह समर्थन, पुरोहितांशिवाय विवाह ,मराठीतून मंगलाष्टका असे त्यांनी सुधारक कार्य केले. धर्म, समाज, परंपरांचे सत्य समोर आणण्याचे काम या सत्यशोधक समाजातर्फे केले.महात्मा फुलेंचे महात्मापण त्यांच्या नुसत्या निरीक्षणात नाही तर अन्यायविरुद्ध केलेल्या ठोस उपायांमध्ये आहे . याविषयी दुमत असण्याचे कारण नाही .
वरील सर्व गोष्टी लक्षात घेता असे ठामपणे म्हणता येईल की ज्योतिबांनी भारतीय समाजातील कुप्रथा ,अंधश्रद्धा ,गुलामगिरी यांचा कडाडून विरोध केला. नुसता विरोध केला नाही तर त्यावर उपाय शोधून काढले . त्यांची अंमलबजावणी केली . साऱ्या सुधारणांची सुरुवात स्वतःपासून केली . त्यामुळे भारतातील सर्व सुधारणांचा पहिला मान त्यांनाच मिळतो .
भारतीय समाज सुधारक, प्रबोधक ,लेखक ,दार्शनिक,शिक्षणतज्ञ ज्योतिबा फुले आपल्या महाराष्ट्रात लाभले. हेच आपले भाग्य आहे. महाराष्ट्राचे पुरोगामीत्व या द्रष्ट्या नेत्यामुळे आहे हे मान्यच करावे लागेल.
गीताग्रजा
९४२०४५६९१८
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे