उत्तरकाशीमधील सिलक्यारा येथील निर्माणाधीन बोगद्यात मागील १७ दिवसांपासून सुरू असलेली बचाव मोहिमेला काही वेळेतच यश मिळण्याची चिन्हे आहेत. या बोगद्यात अडकलेले ४१ मजूर थोड्याच वेळात बाहेर येतील असे सांगण्यात येत आहे. हे अडकलेले मजूर आणि बचाव पथक यांच्यात आता फक्त 3 मीटरचे अंतर उरले आहे.आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना सुखरूप बाहेर काढता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.४१ रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक बोगद्याच्या बाहेर तैनात करण्यात आले आहे.
सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम ‘ऑल वेदर रोड’ प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला होता बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे 60 मीटरचा भाग खचल्याने ४१ कामगार अडकले होते. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या २ किलोमीटर लांबीच्या भागात हे कामगार अडकले असल्याने ते आतमधील पोकळीत सुरक्षित आहेत. त्यांची सुटका करण्यासाठी १७ दिवसांपासून बचावकार्य सुरू आहे. एकीकडे या कामगारांपर्यंत पोहचण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानापासून सर्व गोष्टींचा वापर केला जात असून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
हे कामगार ज्या ठिकाणी अडकले आहेत तिथे वीज आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच कामगारांना पाइपलाइनद्वारे अन्नासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. अत्याधुनिक कॅमेऱ्याद्वारे घेतलेली या कामगारांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्याचं व्हिडीओ शुटींग करण्यात आले होते.