उबाठा गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
दळवी यांच्या अटकेमुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भांडूप पोलीस स्टेशन बाहेर जमले आहेत.शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली. यावेळी दत्ता दळवी यांनी जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केले ,असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली.त्यानुसार,दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आज त्यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भा.द.वी कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला.