राज्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा मराठवाड्याला मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील एकूण ४७ हजार १०९ हेक्टरवरील क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. ज्यात, २२ हजार ९७ हेक्टरवरील जिरायत क्षेत्रावरील, तर २४ हजार ८५५ हेक्टरवरील बागायत क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, एकूण १५७ हेक्टरवरील फळबागचे देखील नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले आहे. हजारो शेतकऱ्यांना हा अवकाळीचा फटका बसला आहे.
मराठवाड्यात रविवारी अनेक तालुक्यांत वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यात विभागातील आठपैकी जालना, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
अवकाळी पावसात शेतात पाणीच पाणी झाल्याने रब्बीसह फळबाग, भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या कापूस उद्ध्वस्त झाला आहे. तर ज्वारी, गहू, हरभरा भुईसपाट झाला आहे.