मालेगाव (जि. नाशिक) तालुक्यातील काष्टी क्रीडा संकुलासाठी 25 कोटी रुपयांची तत्वतः मान्यता देण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आज काष्टी क्रीडा संकुलासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, क्रीडा विभागाचे आयुक्त सुहास दिवसे (दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे), उपसचिव सुनील हांजे हे उपस्थित होते.
मंत्री श्री.बनसोडे म्हणाले की, मालेगाव शहरासह कृषी विद्यापीठ आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना सरावाबरोबर स्पर्धा घेण्यासाठी या क्रीडा संकुलाचा उपयोग होणार आहे. या क्रीडा संकुलासाठी लवकरात लवकर शासनास प्रस्ताव सदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत काष्टी येथील १५ एकर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी. क्रीडा अधिकारी यांनी जागा हस्तांतरण आणि क्रीडा संकुलातील सोयीसुविधा विषयी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. बनसोडे यांनी दिल्या.
मंत्री श्री. भुसे यांनी मालेगाव कॅम्प भायगाव रोड येथे क्रीडांगणासाठी राखीव असलेल्या जागेवर अद्ययावत जलतरण तलाव बांधण्यात यावे. शहरातील लोकसंख्या तसेच या ठिकाणी उपलब्ध असलेल्या क्रीडा संकुलाचा मालेगाव परिसरातील खेळाडूंच्या गुणवत्तेचा विचार करता जलतरण तलाव व क्रीडांगण हे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.