राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ही घटना घडली आहे.या हल्ल्यात टोपे यांच्या गाडीची समोरची काच फुटली आहे.तसेच गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली देखील आढळून आली आहे.
जालन्यात मध्यवर्ती बँकेच्या निवडणूका आहेत. त्यानिमित्ताने टोपे हे जिल्हा बँकेत आले होते. यावेळी टोपे यांची गाडी इमारतीजवळ उभी होती. मात्र अद्याप हे हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी नेमकं कोणत्या कारणाने हल्ला केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. टोपे यांचा चालक गाडीमध्येच उपस्थित होता अशी माहिती मिळत आहे. टोपे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.