श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकासकामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते लोकार्पण
श्रीवर्धन तालुक्यातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर, अंतर्गत श्रीवर्धन शहर पाणीपुरवठा योजना आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांचे
लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी यावेळी दिली.
या लोकार्पण सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे,खासदार सुनील तटकरे,आमदार अनिकेत तटकरे,मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टे वाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,मुख्याधिकारी विराज लबडे,प्रांतधिकारी डॉ.दीपा भोसले,तहसीलदार महेंद्र वाकलेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सोयाबीन साठी, कांद्यासाठी, टोमॅटो साठी शासनाकडून मदत दिली जाते.त्याप्रमाणे कोकणातल्या शेतकऱ्यांना देखील मदत करणार असल्याची घोषणा पवार यांनी केली. कोकणातला शेतकरी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेत नाही. आंबा, काजू, नारळ, सुपारी यांच्या बागा व फळांची पिके घेऊन कोकणातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतो.या शेतकऱ्यांच्या विकासासाठी शासन विशेष प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोकण किनारपट्टीला वादळाचा फटका बसल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी वादळात टिकतील अशी निवारा केंद्रे शासनाकडून बांधली जाणार आहेत. वादळात विजेचे खांब पडल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी संपूर्ण कोकणामध्ये अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी लाईन करण्याचा शासनाने निर्णय घेतला असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी सांगितले. तसेच श्रीवर्धन आणि परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री पवार पुढे म्हणाले रेवस- रेड्डी या सागरी महामार्गाला 9 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. धरमतर खाडीवरील पूल व बागमांडले बाणकोट पूल यासाठी शासनाने जवळजवळ 3000 कोटींची तरतूद केलेली असून येत्या पंधरा दिवसात निविदाप्रक्रिया राबविण्यात येईल.
शासनाने महिलांना एसटी प्रवासामध्ये 50% सूट दिली आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणावर सर्वांनी भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. समाजातील सर्व घटकंच्या कल्याणसाठी राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्नशील असून विविध लोकांभिमुख निर्णय घेण्यात येत असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना सुरू केल्या असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी खा. सुनील तटकरे यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. अनिकेत तटकरे यांनी केले.
पाणी पुरवठा योजना –
श्रीवर्धन शहरातील नागरिकांना कायमस्वरुपी शुध्द व नियमीत यांनी पाणी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान (राज्यस्तर) अंतर्गत रक्कम रुपये २२.७३ कोटीची सुधारीत पाणीपुरवठा योजना
खा. सुनील तटकरे यांनी प्रस्तावित केली होती. हि योजना २०५१ ची लोकसंख्या विचारात घेवून तयार केली आहे. या योजनेमध्ये अशुध्द व शुध्द पाण्याच्या २० एच.पी. च्या ४ पंपिंग मशीनरी, ८.५ किमी लांबीची ३१५ मि.मी. व्यास एच.डी.पी.ई. शुध्द पाण्याची गुरुत्व वाहिनी, जवळपास २३ किमी लांबीची अंतर्गत वितरण व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शहरातील आराठी येथे ७.५० लाख लिटर, धोंडगल्ली येथे २ लाख लिटर व जीवना येथे २ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. •
या योजनेमध्ये ८५ कि.वॅ. क्षमतेचे सोलार सिस्टिम बसविण्यात आलेली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जलशुद्दिकरण केंद्र येथील पंपिंग सिस्टिम वगळता शहरामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी पंप नसून जलशुद्दिकरण केंद्र येथील उंच साठवण टाकीतून येणारे पाणी शहरातील पाण्याच्या टाक्यांमध्ये ग्रॅव्हिटीद्वारे पुरविण्यात येते. त्यामुळे नगरपरिषदेचे येणारे लाईट बिल अत्यंत कमी प्रमाणात येणार असून योजना चालविणेसाठी येणाऱ्या कमी खर्चामुळे सदर योजना नगरपरिषदेचे दायित्व न बनता शहरासाठी मालमत्ता म्हणूनच उपयोगात येणार आहे.
श्रीवर्धन बीच सुशोभिकरण कामांमध्ये समुद्रकिनारी सध्या अस्तित्वात असलेल्या बंधा-यालगत आयताकृती आकाराचे खुले प्रेक्षागृह आणि ओपन जीम ची सोय केली आहे. त्रिकोणाकृती आकारामध्ये भागामध्ये सेल्फी पॉइंट, उपहारगृह, इ. चे प्रयोजन केले आहे. तसेच बॉक-वे वर मनमोहक पथदिवे, मनोरे, हायमास्ट या बाबींची देखील तरतूद केली आहे. पर्यटकांना तसेच नागरिकांना बसण्यासाठी कौक्रिट फायबर बॅचेस, पॅव्हेलियन चा समावेश आहे. ठिकाणी कचरापेट्यांची सोय तसेच स्वच्छतागृहाची सोय करणेत आली आहे. सध्या १२००,००मी. लांबीचा धूपप्रतिबंधक बंधारा अस्तित्वात आहे. समुद्रकिनारी बंधाऱ्यावर बॉच टॉवर, सेल्फी पॉइंटची तरतूद देखील करणेत आली आहे. अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेनंतर अशा प्रकारे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त समुद्रकिनारा विकसित करणारी श्रीवर्धन नगरपरिषद ही एकमेव नगरपरिषद आहे.