सायन रुग्णालयात लवकरच १२०० खाटा उपलब्ध होणार; सोनोग्राफी, डायलिसीसची सुविधा वाढविणार
तुम्हाला रुग्णालयात औषधे मिळतात का..बाहेरून आणावी लागत नाही ना..ट्रीटमेंट कशी सुरू आहे..वेळेवर जेवण मिळते ना..सायन हॉस्पीटलमधील रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधलेला हा संवाद..आज महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ट्रॉमा आयसीयु, सर्वसाधारण वॉर्ड, वॉर्ड क्रमांक चार येथे पाहणी करताना रुग्णांची विचारपूस केली आणि दिलासा दिला. यावेळी त्यांनी अचानक रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची पाहणी केली.
सायन हॉस्पीटलमध्ये 200 खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने 1200 खाटा उपलब्ध होतील, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुंबईच्या सखोल स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाला साकाळी सातच्या सुमारास भेट दिली.
सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी याभेटी दरम्यान निर्देश दिले. रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
रुग्णालयाची पाहणी करून तेथील रुग्णांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच त्यांनी रुग्णालयातील सामान्य विभागासह अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना मिळत असलेल्या उपचारांची माहितीही त्यांनी घेतली. रुग्णांची गैरसोय होते का याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतले.
सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही. असे मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सायन रुग्णालयाचा परिसर पिंजून काढला. प्रत्येक वॉर्डात जाऊन त्यांनी माहिती घेतली. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतुक करतानाच रुग्णाला वेळेवर औषध, जेवण मिळेल यासाठी प्रशासनाला सूचना केल्या. रुग्णालयाच्या स्वयंपाक गृहाची पाहणी करताना तेथील साफसफाई आणि अन्नाची गुणवत्ता याबाबतही त्यांनी सूचना केल्या. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले याचा रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद होता तर एका वॉर्डात तर एका रुग्णाने चक्क मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फीही घेतली.