3 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी विविध खेळ प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे क्रीडानगरी म्हणून नाशिकचा नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन छगन भुजबळ यांनी केले.
मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे 67 व्या राष्ट्रीय शालेय खो खो स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, स्कूल गेम फडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक के एस मूर्ती, कनक चतूर्धर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू कविता राऊत यांच्यासह देशातील विविध राज्यांचे खो खो खेळाडू उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिकला लाभलेली नैसर्गिक संपन्नता व आरोग्यदायी वातावरण सर्वच प्रकारच्या खेळांसाठी पोषक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी याचा योग्य वापर करून जिल्ह्याचे नाव विविध खेळ प्रकारात जागतिक पातळीवर उंचावले आहे. यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत यांच्यासह विधीत गुजराती, दत्तू भोकनळ, अंजना ठमके, मोनिका अत्रे, संजीवनी जाधव, दुर्गा देवरे, किसन तडवी, ताई बामणे यासारख्या नामांकित खेळाडूंनी जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे. क्रीडा विश्वाला समृद्ध करणाऱ्या या खेळाडूंमुळेच नाशिकची ओळख आता क्रीडानगरी म्हणून नावारूपाला येत असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या काही वर्षांत खेळाकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यामुळेच पालक देखील अभ्यासासोबतच मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देत असल्याने नवीन खेळाडूंचा विविध खेळ प्रकारात सहभाग वाढत आहे. तसेच शासनाच्या नव्या क्रीडा धोरणानुसार तालुका, जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलासाठी देण्यात येणाऱ्या निधीत देखील दुपटीने वाढ करण्यात आली आहे. जेणेकरून खेळाडूंना खेळासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि ते जिल्ह्याच्या नावसोबतच राज्याचे व देशाचे नाव उंचवतील. खेलो इंडिया आणि टॅलेंट हंट यासारख्या स्पर्धांचे शासनाकडून आयोजन करण्यात येत आहे. त्यातून चांगल्या खेळाडूंची निवड करून २०२८ ऑलिंपिकसाठी त्यांच्याकडून तयारी करून घेण्यात येत आहे. आज नाशिकचे खेळाडू टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, मैदानी खेळ, खो-खो, बॅडमिंटन, सायकलिंग, स्वीमिंग, तलवारबाजी, नौकानयन, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, शूटिंग, पॅरा ॲथलेटिक्स, रोइंग, फुटबॉल, मल्लखांब, जिम्नॅस्टिक यांसारख्या अनेक खेळांत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून आपले नैपुण्य सिद्ध करीत आहेत, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले, स्पर्धाच्या आयोजनामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते. खेळांमध्ये होणारी हार- जीत ही खेळाचाच एक भाग असते. खेळामुळे संघशक्ती वाढते. असे सांगून जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी विविध राज्यांमधून आलेल्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर देशातील 28 राज्यांच्या खेळाडूंनी संचलन केले. मंत्री श्री भुजबळ यांनी कार्यक्रम संपल्यावर सर्व उपस्थित खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या. आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धा 7 डिसेंबर पर्यंत सुरू असणार आहेत. यामध्ये देशातील 28 राज्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याचे क्रीडा उपसंचालक रविंद्र नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.