मिचॉंग चक्रीवादळाचा दक्षिण भारतात मोठा फटका बसला आहे. चेन्नई विमानतळ पूर्णपणे पाण्याखाली गेले असून विमानसेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. विमानतळावर आणि रनवेवर दोन फुटांपेक्षा अधिक पाणी साचल्याने विमानसेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चेन्नईसह नजीकच्या जिल्ह्यांमध्ये आज झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर तामिळनाडू राज्यात हाहाकार माजला असून आंध्रप्रदेशात देखील या चक्रीवादळाची तीव्रता दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरातील “मिचॉंग” चक्रीवादळामुळे तामिळनाडू व आंध्रप्रदेशच नाही तर महाराष्ट्र देखील कमीअधिक प्रमाणात प्रभावित होणार आहे. विदर्भासह मराठवाड्याला आज पावसाचा इशारा देण्यात आला असून विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘मिचॉंग’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सोमवरपासूनच ढगाळ वातावरण अवकाळी असून पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे.