मराठा आरक्षणाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दाखल केलेल्या क्युरेटीव्ह याचिकेवर उद्या म्हणजे ६ डिसेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सुनावणीमध्ये अॅड. जयश्री पाटील विरोधक आहेत.
राज्य सरकारने १३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटीव्ह पिटीशन दाखल केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडत आहे. या याचिकेवर आता मराठा आरक्षणाचे सर्व भवितव्य अवलंबून असणार आहे. राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले असताना त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात होणारी ही सुनावणी महत्वाची ठरणार आहे. या याचिकेच्या सुनावणीवर मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्याच निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.