खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने अमेरिकेतून भारताला धमकी दिली आहे. संसदेचा पाया हलवून टाकू, अशी धमकी पन्नूने एका व्हिडिओमधून दिली आहे.
‘भारतीय संरक्षण यंत्रणांनी मला संपवण्याचा कट रचला होता. पण, त्यात ते अपयशी ठरले आता 13 डिसेंबर किंवा त्याआधीसुद्धा संसदेवर हल्ला करून याचे जशास तसं उत्तर दिलं जाईल’, असे म्हणत पन्नूने धमकी दिली आहे. दरम्यान याची माहिती कळताच गुप्तचर यंत्रणांसह इतर सुरक्षा दलांसह दिल्ली पोलिसांनी तातडीनं सुरक्षाव्यवस्थेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
भारताला धमकी देणाऱ्या पन्नूच्या डोक्यावर टोपी आहे. त्यावर ‘दिल्ली बनेगी खलिस्तान’ असं लिहिलेले आहे. गुरपतवंत सिंग पन्नू हा सिख फॉर जस्टिस (एसजेएफ) चा म्होरक्या असून, एक खलिस्तानी दहशतवादी आहे. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा अशा दोन्ही देशांची नागरिकता असून, तिथूनच तो व्हिडीओंच्या माध्यमातून भारताला धमकी देत असतो.