जगभरातील लोक भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतात. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
दादर चैत्यभूमी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी राज्यपाल श्री. बैस बोलत होते.
यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, सदा सरवणकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे, देशभरातील आलेले अनुयायी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान शिक्षणतज्ज्ञ होते, शोषितवर्गाचे शिक्षण झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मागास, वंचित, बहुजनांना शिक्षण मिळण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. पीपल्स एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्थांच्या माध्यमातून आजही काम सुरू आहे. महिलांच्या अधिकारासाठी कार्य केले आणि महिलांना सन्मान मिळवून दिला. इंदू मिल येथील निर्माणाधीन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण होईल, याचा मला विश्वास असल्याचेही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले.
भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानानुसार भारतीय लोकशाहीची वाटचाल सुरू आहे. भारतीय संविधान संविधानिक जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.