विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तसेच माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
शिबिरप्रमुख दिलीप जाधव, सहशिबिरप्रमुख राजन पारकर यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या दहा दिवसांत अधिकाधिक कामकाज चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी अधिवेशनातील वेळेचा सदुपयोग करण्यावर आमचा भर आहे, असे श्री. नार्वेकर व डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
विधानपरिषदेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त महत्त्वाची विधेयके, ठराव, प्रस्तावांवरील चर्चा, परिषदेची शतकपूर्ती वाटचाल याबाबत ग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहेत, असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष व विधानपरिषद उपसभापतींनी पत्रकारांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. श्री. जाधव व श्री. पारकर यांनी स्वागत केले. विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, डॉ. राहुल तिडके, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.