संताजी जगनाडे (अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य होते.
▪️ संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथे झाला. . विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. संताजी महाराजांनी लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड बालपणीच निर्माण झाल्यामुळे ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यांंपैकी एक झाले.
▪️त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनांच्या आणि अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला आणि त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले, की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामांच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.
▪️त्याकाळी संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना मुखोद्गत होते म्हणून त्यांनी ते पुन्हा लिहून काढले.
▪️शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजीना दिले होते. परंतु तुकाराम महाराज हे संताजी जगनाड्यांच्या अगोदरच वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, जेव्हा संताजी वारले तेव्हा अंत्यसंस्काराच्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी काही संताजींचे पूर्ण शरीर गाडले जात नव्हते, त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले आणि त्यांनी तीन मुठी माती टाकल्यानंतर संताजींचा पूर्ण देह झाकला गेला.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे