केंद्र शासन विविध लोकहितपयोगी योजना राबवित असते. अशा केंद्रपुरस्कृत योजना राज्यातही राबविण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिले.
नागपूर येथील हैदराबाद येथील हाऊस मुख्य सचिव कार्यालयात केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्य सचिव श्री. सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीला मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव मकरंद देशमुख यांच्यासह विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.
आयुष्मान भारत योजनेची माहिती ऑनलाइन पोर्टलला योग्य पद्धतीने भरण्याच्या सूचना करीत मुख्य सचिव श्री. सौनिक म्हणाले की, ग्रामसडक योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे पूर्ण करावी. त्यासाठी केंद्र शासनाने दिलेला निधी प्राधान्याने खर्च करावा. भारतनेट बाबत स्थानिक स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी कृषी, आरोग्य, शिक्षण, महसूल व इतर संबंधित विभागांची बैठक बोलवावी.
तसेच मुख्य सचिव श्री सौनिक यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, भारतनेट या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते.