शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, कीटकनाशकांची उपलब्धता व सामूहिक शेतीच्या माध्यमातून शेतमालाला बाजारपेठ मिळवून देवून शेतीशी निगडित उद्योग उभारणीत उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
क्रीडा संकुल, वरोरा येथे विदर्भ प्रादेशिक शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रिती हिरळकर, वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे नरेंद्र जिवतोडे, कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे पदाधिकारी तसेच जयकुमार वर्मा, देवराव भोंगळे, राहूल पावडे, अतुल देशकर, चंदनसिंह चंदेल, हरीश शर्मा, संध्या गुरनुले आदी उपस्थित होते.
वैनगंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून मागील 2 वर्षात विशेषत: चंद्रपूर आणि वरोरा तालुक्यात उत्कृष्ठ काम झाले याचा आनंद आहे, असे सांगून केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जिल्ह्यातील 52 शेतकरी उत्पादक कंपन्या महासंघाला जुडल्या आहेत. महासंघाच्यावतीने सर्व कंपन्यांना नवनवीन योजनांची माहिती देऊन नवीन उद्योग उभारणीसाठी सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे. महासंघामध्ये जिल्ह्यातील 15 तालुक्याचे 15 संचालक आहेत आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उद्योग कसे उभे करता येईल? हा त्यांचा प्रयत्न आहे. स्मार्ट प्रकल्पात प्रकल्प संचालक आत्मा विभागाच्या वतीने विदर्भामध्ये उद्योग उभारणीत चंद्रपूर जिल्हा अव्वल स्थानी आहे, याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांचे कार्य वाढवावे, त्यातून शेतकऱ्यांचा नक्कीच विकास होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 52 शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये 45 हजार शेतकरी कुटुंब या महासंघाला जोडले आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांचे भवितव्य आहे. याकरीता सर्वांनी एकत्र येऊन प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांना नेतृत्व देऊन फार्मर प्रोडूसर कंपन्या तयार केल्यास शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल व दलालाच्या कचाट्यातून सुटका होईल. तसेच विविध उत्पादनाला भारतीय बाजारपेठ तर मिळेलच पण निर्यात देखील मोठ्या प्रमाणावर होईल. नागपूर येथील ॲग्रो व्हिजनमध्ये जसे मार्गदर्शन झाले त्याचप्रमाणे वर्षभर मार्गदर्शन मिळेल अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, जिल्ह्यामध्ये जसे फार्मर प्रोडूसर कंपन्या तयार केल्या गेल्या आहेत त्याचप्रमाणे, नाशिकमध्ये सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार करण्यात आले आहे. या कंपनीने 1300 कोटी रुपयाचे द्राक्षे निर्यात करुन येथील शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिला. सह्याद्री कंपनीसारखेच जिल्ह्यात काम व्हावे, तरच शेतकरी समृद्ध, संपन्न आणि कर्जमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हिंगोलीमध्ये गोदावरी फॉर्म, सांगली येथे झुकेरी फॉर्म, सातारा येथे ॲग्रो व्हिजन फार्मर कंपनी यासारखेच, महाराष्ट्रात यशस्वी प्रयोग जिल्ह्यात यशस्वी कसे करता येईल? यासाठी सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. फार्मर प्रोडूसर कंपन्याकरीता दोन योजना आहेत. यामध्ये 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी केंद्र पुरस्कृत योजनेत 7 हजार कोटी रुपयांची तरतूद केंद्र शासनाने केली आहे. शेतकऱ्याचा माल थेट निर्यात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात पोर्ट ट्रस्ट उभारण्यात येत आहे. या पोर्टच्या माध्यमातून जगात माल निर्यात करता येईल यामुळे शेतकऱ्यांना अधिकच फायदा मिळेल.
जगाच्या मार्केटमध्ये यशस्वी व्हायचे असल्यास उत्पादनात 100 टक्के गुणवत्ता असावी. उत्तम क्वालिटी, पॅकेजिंग, ब्रँडिंग असावे. येणाऱ्या काळात या पोर्टवरून देशाच्या कानाकोपऱ्यात माल निर्यात करण्यासाठी व्यवस्था केली जाईल. या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांचा माल पॅकेजिंग करून विकल्यास दीडपट भाव शेतकऱ्यांना मिळेल व शेतकरी संपन्न व समृद्ध होईल. सर्वांच्या प्रगती व विकासाकरीता मदर डेअरीला विदर्भात आणले आहे. मदर डेअरीच्या कच्च्या दुधाची खरेदी साडेचार लाख लिटर आहे. हि दूध खरेदी 30 लाख लिटरवर नेण्याचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले. विदर्भातील दूध चांगला भावाने खरेदी केल्या जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाला चालना द्यावी. नागपूरला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर काऊ उघडण्यात येत आहे. व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने अशाचप्रकारचे मोठे गाईचे हॉस्पिटल चंद्रपूर जिल्ह्यात व्हावे यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी करावी. मदर डेअरीसाठी अनेक योजना तयार करण्यात येत आहे. यासाठी राज्य व केंद्र शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले. बुट्टीबोरीमध्ये 650 कोटी रुपये खर्च करून मोठा प्लांट उभा राहत आहे. ज्यामध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात येऊन आतंरराष्ट्रीय बाजारात निर्यात करण्यात येईल. या खाद्यपदार्थासाठी लागणारे 30 लाख लिटर दूध विदर्भ व मराठवाड्याच्या जिल्ह्यातून नागपूरला येणार असून दुधाचा महापूर विदर्भात तयार करण्याकरीता सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
दुग्ध उत्पादन जिल्ह्यात वाढावे यासाठी 12 लाख गायी राज्य सरकार देणार आहे. गोटफार्मच्या धर्तीवर काऊ फार्म तयार करावा व दुध उत्पादनाच्या वाढीस चालना द्यावी. वर्षभर हिरवा चारा मिळाल्यास दूध उत्पादन वाढेल यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी पशुखाद्यासाठी पुढाकार घ्यावा. विदर्भात 30 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत असेल तर पशुखाद्य देखील विदर्भातच व्हावे या दृष्टीने प्रयत्न करावे. चांगल्या क्वालिटीचे पशुखाद्य कमी दरात विकल्यास त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होईल, याकरीता 20 ते 25 पशुखाद्याचे कारखाने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. पूर्व विदर्भात साडेसहा हजार मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मत्स्य व्यवसाय केल्यास करोडोने उत्पन्न वाढेल. येणाऱ्या काळात मत्स्य उत्पादनाला सामोरे जायचे आहे. तसेच गहू, तांदूळ, कापूस लावून शेतकऱ्यांचे भले होणार नसून यासाठी क्रॉप पॅटर्न बदलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
प्रास्ताविकेत बोलतांना वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाचे नरेंद्र जीवतोडे म्हणाले, विदर्भस्तरीय शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी 15 तालुक्यातील संचालकांनी मिळून निर्णय घेतला की, 15 ही तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या एका सूत्रात बांधून त्या कंपन्यांना प्रशिक्षित करून तळागाळापर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पाच्या माध्यमातून 24 प्रकल्प उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी साधारणतः दहा प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, कांचनी शेतकरी उत्पादक कंपनीचे 50 कोटी रुपयाचे टर्नओव्हर चालू झाले आहे. जिनिंग तसेच सर्व प्रक्रिया उद्योग सुद्धा सुरू झाले.