मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांना मार्शल बोलवून सभागृहाच्या बाहेर काढायला पाहिजे, असे त्यांनी म्हणत निशाणा साधला आहे. नवाब मलिक यांना प्रकृती ठीक नसल्यामुळे जामीन मिळाला होता पण औषध उपचार करण्यासाठी मिळालेला जामीन सभागृहात येऊन कसा वापरू शकतात?
ज्या व्यक्तीवर दाऊदसोबत आर्थिक व्यवहार असलेले संबंध आरोप झालेत. तो माणूस सभागृहात येणे ही बाब लांच्छनास्पद आहे. इतर पक्षाच्या आमदारांनी सुद्धा हे कसे सहन केले. महाराष्ट्राची विधानसभा स्थापन झाल्यापासून आजपर्यंतचा नवाब मलिक सभागृहात बसल्याचा काळाकुट्ट दिवस आहे, अशी टिपण्णी सुद्धा प्रकाश महाजन यांनी केली आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देशद्रोहाचा आरोप असलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक अजित पवार गटाच्या बाजूला जाऊन बसले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात वादळ आले . दरम्यान काल नवाब मलिक यांच्या हिवाळी अधिवेशनातल्या उपस्थिती नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांच्याबाबत नाराजी बोलून दाखवली होती आणि त्यांच्या म्हणण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनुमोदन दिले होते.त्यानंतर आता मनसेदेखील आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.