‘स्वामी’ कादंबरीला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अध्यक्षस्थानावरून प्रतिपादन
राज्यकारभारासोबतच कोणत्या जीवन मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी राज्यकर्त्याने प्रयत्न केले यावरून त्या राज्यकर्त्याचे मूल्यमापन होते. माधवराव पेशवे यांचे चरित्र या निकषांवर उठून दिसते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी रविवारी केले.
▪️देसाई यांचे कुटुंबीय आणि मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या वतीने आयोजित स्व. रणजित देसाई लिखित ‘स्वामी’ कादंबरीला साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त “स्वामी – एकसष्ठी एका महान पर्वाची” कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
▪️ श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणेचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, स्व. देसाई यांच्या कन्या मधुमती शिंदे व पारू नाईक, मेहता प्रकाशनचे अखिल मेहता आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
▪️मा..दत्तात्रेय होसबाळे म्हणाले, “एखाद्या राज्यकर्त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन दोन कसोट्यांवर होते. एक म्हणजे त्याने राज्याचा कारभार कसा केला राज्याचा विस्तार कसा केला यावरून आणि दुसरे म्हणजे, कोणत्या जीवनमूल्यांच्या प्रस्थापनेसाठी राज्यकर्ता प्रयत्न करतो, यावरून. माधवराव पेशवे यांचे चरित्र या दोन्ही निकषांवर खरे उतरते. नानासाहेबांचे उत्तराधिकारी म्हणून 16व्या वर्षी माधवरावांनी राज्यकारभार हाती घेतला तेव्हा परिस्थिती बिकट होती. मात्र त्यांनी शत्रूवर विजय मिळविला आणि एक प्रकारे मराठा साम्राज्याचे पुनरुज्जीवन केले.”
▪️ते पुढे म्हणाले, की एखाद्या कादंबरीचे 61 वर्षांची पूर्ती साजरी करणे हे आगळा साहित्यिक कार्यक्रम आहे. रणजित देसाई यांनी आपल्या कादंबऱ्यांमध्ये जीवन मूल्यांना प्रमुख स्थान दिले. महापुरुषांमधील व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवताना रणजित देसाई यांनी त्याला साहित्याचे अधिष्ठान दिले. त्यामुळे त्यांच्या साहित्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत आली आहे.
▪️मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “रमाच्या भूमिकेच्या निमित्ताने मला अनेकदा ‘स्वामी‘ वाचायला मिळाली हे माझं भाग्य आहे. या विषयाने मला खूप भुरळ घातली.”
▪️यावेळी रघुजी राजे आंग्रे म्हणाले, “अवघ्या मराठेशाहीचा डोलारा तरुण माधवराव पेशवे यांच्या खांद्यावर होता. तो त्यांनी कसा पेलला, हे या कादंबरीत मांडले आहे. कुठल्या प्रकारच्या जबाबदाऱ्या माधवरावांनी सांभाळल्या ते ही कादंबरी वाचल्यावर कळते.”
▪️अखिल मेहता यांनी प्रास्ताविक केले. मधुमती शिंदे आणि पारू नाईक यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला. मधुमती शिंदे लिखित ” स्वामीकार” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर स्व. देसाई यांचे नातू सिद्धार्थ शिंदे यांनी आभार मानले.