मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या चरित्र कलाकारांमधले जेष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मराठी चित्रपटातील दिग्गज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे हे रवींद्र बेर्डे यांचे सख्खे बंधू तर नाट्य दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे त्यांचे चुलत बंधू.आपल्या भावासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. तसेच रवींद्र यांच्या विनोदी भूमिका फार गाजल्या.
मालिका, जाहिराती, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्यांनी काम केले होते. ‘होऊन जाउ दे’, ‘हमाल दे धमाल’, ‘थरथराट’, ‘चंगु मंगु’, ‘उचला रे उचला’, ‘बकाल’, ‘ धडाकेबाज’, ‘गंमत जंमत ‘, ‘ झपाटलेला’, ‘भुताची शाळा’ अशा कित्येक मराठी चित्रपटांतून भूमिका करत त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली होती.