संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा १० वा दिवस आहे. आज लोकसभेचे कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला.दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. या दोघांनी त्यांच्या बूटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघे सभागृहापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उमटले आहेत. आज अधिवेशनादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा मांडला. तसेच आपणही काळजी घ्यायला हवी असं म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले,मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका.
या घटनेनंतर राज्य विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनातही आता गॅलरी पासेस देणे बंद केले आहे.लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ हा निर्णय घेतला आहे. विधान परिषद उपासभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची सभागृहात माहिती यांनी दिली आहे. तसेच विधानसभेत आता आमदारांना फक्त दोन पास दिले जाणार आहेत. अधिवेशन कालावधीत गर्दी नको म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.