सोशल मीडियाचा वापर प्रचार, प्रसिद्धी आणि चांगल्या कामासाठी होण्याऐवजी त्याचा गैरवापर वाढत आहे. सोशल मीडिया आपली प्रत्येक हालचाल टिपत असतो. या माध्यमातून सायबर क्राईममध्ये वाढ होवू लागली आहे, याचे बळी पुरूषांसोबत महिला जास्त प्रमाणात पडत आहेत. सोशल मीडियावर महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी ट्रोलिंगची पद्धत आली आहे, मात्र महिलांनी कोणत्याही प्रकारच्या ट्रोलिंगला न घाबरता सामोरे जावून प्रतिकार करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
विधिमंडळामध्ये राज्य महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या वतीने आयोजित दोन्ही सभागृहातील महिला सदस्यांना सायबर सुरक्षित करणारा ‘मिशन ई-सुरक्षा’ कार्यक्रमात डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सचिव माया पाटोळे यांच्यासह दोन्ही सभागृहातील महिला सदस्या उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांच्या छळांचे प्रमाण वाढत आहे. पुरूषांच्या वाईट नजरा, कामाच्या ठिकाणी विविध प्रकारचा लैंगिक छळ याबाबत आलेल्या कायद्याचा महिलांनी वापर करावा. महिला लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील सायबर क्राईमबाबत आवाज उठविणे आवश्यक असून सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये काम कसे चालते याची माहिती घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला तक्रार समित्या असून याचा आढावा कोणी घ्यावा, याबाबत स्पष्टता नसल्याने बैठका होत नाहीत, यावरही आवाज उठविला जावा. महिलांच्या छळवणूक, तक्रारीचा प्रत्येक विभागाचा अहवाल महिला व बालविकास विभागाकडे येत असल्याने या विभागाचे सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. या विभागासाठी असणारा निधी, पदांची शासनाने दखल घ्यावी.
संसदेप्रमाणे महिलांनी प्रत्येक गावातील अडचणी सोडविण्यासाठी 33 टक्के महिला आणि 33 टक्के अधिकाऱ्यांनी मिळून बैठका घेवून महिलांच्या समस्या, अडचणी सोडविणे आवश्यक आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात पोलीस महानिरीक्षक, महिला आमदार, महिला आयोग सदस्य यांचीही बैठक घेवून महिलांच्या समस्या सोडविताना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा करून सोडवणूक करण्याचे आवाहनही डॉ. गोऱ्हे यांनी केले.
ग्रामीण आणि शहरी भागातील सायबर क्राईमबाबत महिलांच्या तक्रारी येतात, मात्र पुरावा मिळत नसल्याने आरोपी सापडत नाही, अशावेळी सायबर तज्ज्ञांची मदत घेवून अशा तक्रारींचा निपटारा करणे शक्य होणार आहे. महिलांनी अश्लिल संदेश, घाणेरडे बोलणे याबाबत 112 नंबरवर तक्रार करता येते, अशावेळी पोलिसांची मदत घेणे हिताचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडियाचा प्रचाराचे प्रभावी माध्यम…पण जपून करा-कु. आदिती तटकरे
सध्या प्रचार, प्रसाराची माध्यमे बदलली आहेत. आपले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यम आली आहेत. सोशल मीडिया प्रचार, प्रसिद्धीसाठी प्रभावी माध्यम असून याचा महिलांनी जपून वापर करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री कुमारी तटकरे यांनी केले. सोशल मीडियाचे खाते हॅक होणे, अश्लिल कमेंट, योग्य की अयोग्य याबाबत सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे. याबाबत शासन योग्य दखल घेणार आहे. महिलांनी डीप फेक व्हिडीओ, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) याबाबत सायबर तज्ज्ञाकडून जाणून घेवून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. महिलांच्या सायबर सुरक्षेसाठी महिला आयोग, उपसभापती कार्यालयाच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात श्रीमती चाकणकर यांनी महिला आयोग महिलांची सुरक्षा, अडचणी, समस्या कशा पद्धतीने सोडविते याबाबतची माहिती दिली. महिलांच्या सायबर क्राईमच्या तक्रारी वाढत असून याला आळा घालण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत आवश्यक आहे. सायबरमध्ये गुन्हेगारी वाढत असून त्याच्या सुरक्षेबाबत राज्यभर महिलांसाठी कार्यक्रम घेणार आहे. मानवी तस्करीचा विळखा दूर करण्यासाठीही महिला आयोग काम करणार असल्याचेही श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सायबर गुन्हेगारीबाबत विस्तृत माहिती दिली. मोबाईल हा आपला डिटेक्टिव्ह असून सर्व हालचाली तो टिपत असतो. सर्व सोशल मीडियाला तुमची वैयक्तिक माहिती मोबाईलद्वारे होत असते. एकही व्यक्ती सायबर क्राईमपासून वाचू शकत नाही, यासाठी तंत्रज्ञाचा वापर योग्य आणि काळजीपूर्वक करण्याचे आवाहन श्री. गादिया यांनी केले.