मथुरेतली शाही ईदगाह मशीद ही कृष्ण जन्मभूमीवर उभारण्यात आली आहे, असा दावा करत हिंदू संघटनांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. याप्रकरणी न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल देत शाही ईदगाह मशीद परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची परवानगी दिली आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराला लागून असलेल्या मथुरेच्या शाही इदगाह मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी न्यायालय-नियुक्त आयोग नेमण्याच्या याचिकेला परवानगी दिली असून सर्वेक्षण करण्यासाठी तीन वकील आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार आहे. १६ नोव्हेंबर रोजी न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांनी संबंधित पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अर्जावर निर्णय राखून ठेवला होता.
मात्र या सर्वेक्षणात किती लोक सहभागी होतील? सर्वेक्षण कधी सुरू केलं जाईल? मशीद परिसरातील कोणकोणत्या भागांचं सर्वेक्षण केले जाणार? याबाबतचा निर्णय १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.