मेवाती घराण्याच्या गायिका अंकिता जोशी यांच्या दमदार सादरीकरणाने ६९ व्या ‘सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या दिवसाचा पूर्वार्ध गाजवला
अंकिता जोशी यांनी आपल्या गायनाची सुरवात राग ‘मुलतानी’ने केली. ‘गोकुल गाव का छोरा’ या पारंपरिक रचनेतून आणि त्याला जोडून ‘अजब तेरी बात’ या बंदिशीतून तसेच ‘आये मोरे साजनवा’ या द्रुत रचनेतून त्यांनी रागमांडणी साधली. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील झरीना या व्यक्तिरेखेसाठी पार्श्वगायन केलेली ‘दिल की तपिश’ ही राग किरवाणीवर आधारित रचना त्यांनी सादर केली. रसिकांनी या रचनेला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. अंकिता यांनी ‘नाम गाऊ, नाम ध्यावू, नामे विठोबाला पाहू’ या अभंगाने गायनाची सांगता केली. रसिकांच्या प्रतिनिधी या नात्याने अपर्णा कामतेकर यांच्या हस्ते यावेळी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. अंकिता जोशी यांना तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर यांनी, संवादिनीवर अभिनय रवंदे यांनी साथ केली. तसेच खंजिराची साथ धनंजय कंधारकर यांनी व टाळांची साथ माऊली टाकळकर यांनी केली. तानपुरा साथ मानसी महाजन आणि अदिती रवंदे यांनी केली.
‘हा स्वरमंच माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. माझे गुरू संगीतमार्तंड पं. जसराजजी यांना प्रथम भेटण्याचे भाग्य मला इथेच लाभले, त्यामुळे या स्वरमंचाशी माझे विशेष नाते आहे. तिथे गानसेवा रुजू करण्याची संधी मिळाली, हे भाग्य आहे,’ अशा भावना अंकिता यांनी सुरवातीला व्यक्त केल्या.
सवाईच्या दुसऱ्या दिवशीचे दुसरे सत्र प्रसिद्ध सतारवादक पं. पार्थ बोस यांच्या बहारदार सतारवादनाने रंगले. मैहर घराण्याचा वारसा जपणाऱ्या पं. पार्थ यांनी वादनासाठी राग मारवा निवडला होता. आलाप, जोड, झाला या क्रमाने त्यांचे वादन रंगत गेले. राग खमाज मधील गतमाला (एकाच तालात विविध बंदिशी) सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी तबल्यावर अप्रतिम साथ केली.
Tags: NULL