नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाणपूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
महारेल अर्थात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम) यांनी के.डी.के. कॅालेज जवळ, व्यंकटेश नगर, गोरा कुंभार चौक नंदनवन येथे या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणाच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आले. आज भूमिपूजन करण्यात आलेले सर्व उड्डाणपुल पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यक्षेत्रातील आहे.
यावेळी मंचावर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सर्वश्री आ.चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अॅड. आशिष जायस्वाल, टेकचंद सावरकर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आपण ही कंपनी मी मुख्यमंत्री असताना स्थापन केली आहे. शासकीय कामांमध्ये विशेषतः रेल्वेच्या कामांमध्ये लागणारा विलंब लक्षात घेऊन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यपूर्तता करण्यात या कंपनीचा नावलौकीक आहे. पूर्व नागपुरातील सर्व उड्डाणपुले लवकरात लवकर पूर्णत्वास येतील याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली तसेच आमदार कृष्णा खोपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पाचही उड्डाणपुल नियोजित वेळेत पूर्ण होतील, असे सांगितले.
नागपूर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, वैद्यकीय सुविधा, क्रीडांगणे, शैक्षणिक संस्था यासंदर्भातील कार्याने गती घेतली आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पुढील काळात जोमाने काम करण्याची आमचे प्रयत्न आहेत. जिल्हा व महानगराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबोधित केले. महारेलमार्फत आज मोठ्या प्रमाणात उड्डाणपुलांचे लोकार्पण होत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्ह्यामध्ये महारेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे होत असून राज्यामध्ये उड्डाणपुलांचे काम महारेलने विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. पूर्व नागपुरात अनेक विकासकामे सुरू आहेत. शहरामधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी अमृत योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत असून नागपूरकरांना येत्या काळात कोणत्याच वस्तीला पाण्याची टंचाई जाणवणार नाही. काही दिवसात हे शहर २४ तास पाणीपुरवठा देणारे शहर होईल, असा विश्वास श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.
तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रास्ताविक महारेलचे महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जायसवाल यांनी केले. आ. कृष्णा खोपडे यांनीही नागपुरातील पाच उड्डाणपुलांचे भूमिपुजन झाल्याबद्दल आपल्या मनोगतात आनंद व्यक्त केला.
आज लोकार्पित झालेले राज्यातील 9 उड्डाणपुल
नागपूर जिल्ह्यातील कन्हान रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 559 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 742.20 मी. – किंमत रु. 65.55 कोटी
नागपूर जिल्ह्यातील काटोल रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 282 बी येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 610 मी. – किंमत रु. 57.77 कोटी
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 27 येथील दोन मार्गिका उड्डाणपुल
प्रकल्पाची लांबी – 553.63 मी. – किंमत रु. 46.14 कोटी
नाशिक जिल्ह्यातील खेरवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 95 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 793 मी. – किंमत रु. 39.14 कोटी
जळगाव जिल्ह्यातील जळगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 147 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 1005.62 मी. – किंमत रु. 53.91 कोटी
सांगली जिल्ह्यातील मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 465 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी – 718.75 मी. – किंमत रु. 35.19 कोटी
सांगली जिल्ह्यातील भिलवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्र. 117 येथील दोन मार्गिका उड्डाणपूल
प्रकल्पाची लांबी – 1020.30 मी. – किंमत रु. 88.78 कोटी
ठाणे जिल्ह्यातील सायन-पनवेल विशेष राज्य महामार्गावरील तुर्भे येथील अतिरिक्त दोन मार्गिका उड्डाणपुलाचे रुंदीकरण– प्रकल्पाची लांबी – 1732 मी. – किंमत रु. 155.78 कोटी
मुंबईतील सायन-पनवेल विशेष राज्य महामार्गावरील मानखुर्द येथील अतिरिक्त दोन मार्गिका उड्डाणपुलाचे रुंदीकरण – प्रकल्पाची लांबी – 835 मी. किंमत रु. 86.91 कोटी .
आज भूमीपूजन झालेले नागपुरातील 5 उड्डाणपुल
रेशीमबाग चौक ते के. डी. के कॉलेज चौक आणि टेलिफोन एक्सचेंज ते भांडे प्लॉटपर्यंत दोन मार्गिका उड्डाणपूल – प्रकल्पाची लांबी – 2310 मी. – किंमत रु. 251 कोटी
मसुरकर मार्ग, लाडपुरा येथील चंद्रशेखर आझाद चौक ते मारवाडी चौकपर्यंत दोन मार्गिका उड्डाणपुल
प्रकल्पाची लांबी – 564 मी. – किंमत रु. 66 कोटी
जुना भंडारा रोड, बागडगंज येथील लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमान नगर येथे दोन मार्गिका उड्डाणपुल प्रकल्पाची लांबी – 1351 मी. – किंमत रु. 135 कोटी
मिडल रिंग रोड, खरबी येथील राजेंद्र नगर चौक ते हसनबाग चौक येथे दोन मार्गिका उड्डाणपुल
प्रकल्पाची लांबी – 859 मी. – किंमत रु. 66 कोटी
वर्धमान नगर इंडियन ऑइल पेट्रोल पंप (शिवाजी चौक) ते निर्मल नगरी (उमरेड रोड) येथे तीन मार्गिका उड्डाणपुल – प्रकल्पाची लांबी – 2724 मी. – किंमत रु. 274 कोटी