लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचे सत्र सुरू असल्याचे दिसून येत आहे. काल लोकसभेतील गोंधळ घालणाऱ्या अनेक खासदारांना निलंबित करण्यात आले होते. त्यावरून आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले त्यानंतर आजही आणखी ४९ खासदारांचे निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आले आहे.
आज निलंबित झालेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. तर, लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकूण १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
या खासदारांनी संसदेत येऊन घोषणा देत फलक दाखवल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. या खासदारांच्या वर्तनाने नियमांचा भंग झाला असून लोकसभा अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचे जोशी यांनी सांगितले .निलंबित करण्यात आलेल्या ९२ खासदारांना संसदेचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सभागृहाच्या कामाकाजात सहभागी होता येणार नाही.
तसेच, लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय संसदेच्या इतिहासात खासदारांवर करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितले जात आहे.
सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह लोकसभेतील अनेक विरोधी खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे.