आपले वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान आणि वैविध्यपूर्ण संस्कृती यांच्या बळावर पर्यटन हा गोव्याचा प्रमुख व्यवसाय केंद्रस्थानी मानून त्याप्रमाणे सोयी सुविधांचा विकास केला गेला आहे. अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळून सुट्टी घालवण्यासाठी देशी पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांचे हे जगातील एक आवडते स्थान बनले आहे.
पण आजचे हे गोव्याचे दर्शनामागे बराच मोठा कटू इतिहास, महान लढा, मुक्तिसंग्राम आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाचा टप्पा म्हणजे गोवा मुक्ती. त्याचा इतिहास आज 19 डिसेंबर गोवा मुक्तीदिनी जाणून घेऊयात.
*माझ्या गोव्याच्या भूमित*
*सागरात खेळे चांदी*
*आतिथ्याची अगत्याची*
**साऱ्या षड्रसांची नांदी*
कविवर्य बोरकरांची ही कविता गात गात आमची पिढी मोठी झाली.
सर्व प्रकारच्या नैसर्गिक संपत्तीने अत्यंत श्रीमंत असलेल्या गोव्याकडे पोर्तुगीज देखील आकर्षित झाले. इसवी सन 1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को-द-गामा याने गोव्यात प्रवेश केला तो व्यापारी वसाहत स्थापन करण्यासाठी.
इसवी सन 1520 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यात प्रवेश केला तो मात्र सत्तास्थापनेसाठी. विजापूरच्या आदिलशहाची सत्ता उलथवून टाकून पोर्तुगीजांनी गोव्यात आपली सत्ता स्थापन केली.
ख्रिस्ती धर्म परिवर्तनाची मोहीम सुरू केली. हिंदू विरोधी हिंसाचार, हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा, हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश असे अनेक प्रकारे अनन्वित अत्याचार गोव्यातील जनतेवर सुरु झाले.
18 जून 1946 रोजी पोर्तुगीजांविरुद्ध डॉक्टर राम मनोहर लोहियांनी आवाज उठवला. पंडित दीनदयाळ उपाध्याय या सारख्या नेत्यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटी विरुद्ध बंड पुकारले.
आझाद गोमंतक दलाची स्थापना झाली. विश्वनाथ लवंदे, नारायण हरी नाईक, दत्तात्रय देशपांडे, प्रभाकर सिनारी यांचा प्रमुख सहभाग होता.
भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांनी भारत सोडला. परंतु पोर्तुगीज गोवा सोडण्यास तयार नव्हते. आता स्वातंत्र्यसैनिक या लढ्यात सहभागी होत होते. पुरुषोत्तम काकोडकर, डॉक्टर कुन्हा आदींचा सहभाग होता.
गोवा मुक्तिसंग्रामात महाराष्ट्राने मोलाची साथ दिली. यासाठी ‘गोवा विमोचन समिती’ स्थापन झाली. त्यात एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, शिरुभाऊ लिमये, सेनापती बापट, मधु दंडवते यांचा समावेश होता. एवढेच नव्हे तर संगीतकार सुधीर फडके देखील या लढ्यात हिरीरीने सहभागी झाले होते.
महिला यात मागे नव्हत्या. नुसत्या सहभागी नव्हत्या तर त्यांनी तुकड्यांचे नेतृत्व करून, हाती शस्त्र घेऊन लढा दिला. कमल उपासनी, प्रभा साठे, शांता राव या धारातीर्थी पडल्या. अनेक जणी जखमी झाल्या.
गोव्यातील नागरिकांचे आंदोलन, स्वातंत्र्य सैनिकांचा लढा, आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्णमेनन यांनी भारतीय लष्कराला आदेश दिले व 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीज गव्हर्नर वासेल-द-सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्ताऐवजावर सही केली व भारतीय लष्कर प्रमुखांकडे ते सुपूर्त केले. व गोवा अखेरीस मुक्त झाला. जवळ जवळ 450 वर्षांहून अधिक काळ पारतंत्र्यात असलेला गोवा स्वतंत्र झाला. तो मुक्ती दिन म्हणजेच *19 डिसेंबर 1961.*
या लढ्यातील महत्त्वाची बाजू म्हणजे भारताच्या लष्कराबरोबरच नौदल व वायुदलपण सामिल झाले. गोवा मुक्त करायला भारताच्या सर्व राज्यातून तरुण आले, वृद्ध आले, पुरुष आले, महिला आल्या, सर्व धर्मांचे,सर्व भाषिक लोक आले, सर्व वयोमानाचे, सर्व राजकीय पक्षांचे आणि राजकीय वर्तुळा बाहेर असलेले सामान्यही आले. पोर्तुगीज सरकार आपल्याला गोळ्या घालून ठार मारणार हे माहीत असूनही लोक आले. **राष्ट्रीय एकात्मतेचा एक उदात्त आविष्कार भारताच्या इतिहासात लिहिला गेला.*
स्मिता काळे
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र