समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेच्या विविध उपाययोजना – मंत्री शंभूराज देसाई
नागपूर, दि.२० : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे व अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची चौकशी करण्याबाबतचा प्रश्न सदस्य महादेव जानकर यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते. याचर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य अनिल परब, सत्यजित तांबे, प्रा.राम शिंदे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी यांनी सहभाग घेतला होता.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाची 8 पथके व महामार्ग पोलीस विभागाची 14 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. समृद्धी महामार्गावर वाहन चालक व प्रवाश्यांच्या प्रबोधनासाठी टोल नाक्यांवर समुपदेशन केंद्र उभारण्यात आले आहेत. यामधून रस्ता सुरक्षा जनजागृती केली जाते. वाहनचालकांचे समुपदेशन केले जाते.वाहनांची तपासणी व टायर तपासणी ही समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर केली जाते. प्रवासी बसमध्ये प्रवाश्यांना परवान्याची व वाहनाची माहिती सहजपणे दिसेल या करीता फिट-टू-ट्रॅव्हल असे बोर्ड प्रदर्शित केले जातात. अखिल भारतीय परवान्यावर व ऑल महाराष्ट्र वातानुकूलित कंत्राटी वाहनांची परिवहन विभागामार्फत नियमितपणे तपासणी मोहीम केली जाते.
ज्या 8 जिल्ह्यांमधून महामार्ग जातो त्या जिल्ह्यांमध्ये परिवहन विभागात प्रत्येकी 1 तपासणी पथकाची नेमणूक केली आहे. पथकांकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 8 वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पथकांमार्फत समृध्दी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावणे, रस्ता सुरक्षा विषयक जागृती करणे, वाहनचालकांचे समुपदेशन करणे इत्यादी रस्ता सुरक्षा विषयक कार्ये करण्यात येतात. समृध्दी महामार्गावर 1 डिसेंबर 2023 पर्यंत जवळपास 4500 वाहन चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील अपघातासंदर्भात वाहन चालक व प्रादेशिक परिवहन कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील 2 सहाय्यक मोटर निरिक्षक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यता निधीतून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या परिवारांना आर्थिक सहाय्य दिले. रस्ता सुरक्षा उपाययोजना सक्रियपणे कार्यान्वित करण्यात आली.वाहनांची तपासणी आणि योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्यात आली, अशी माहितीही यावेळी श्री. देसाई यांनी दिली.
मागणीप्रमाणे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबविणार– मंत्री गुलाबराव पाटील
नागपूर, दि. 20 : राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी व साखर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांच्या बालकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. जागेची उपलब्धता, ऊसतोड कामगारांची संख्या, लोकप्रतिनिधींची मागणी यानुसार राज्यात वसतिगृहे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, सचिन अहीर आणि रामदास आंबटकर आदिंनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात 82 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सहा वसतिगृहांचा समावेश आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीड, जालना, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या मुला- मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेच्या एकूण २० शासकीय वसतिगृहांपैकी मुलांसाठी ८ व मुलींसाठी ९ अशी एकूण १७ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारी २०२४ मध्ये वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्याठिकाणी जागेची अडचण येत असेल त्याठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून भाड्याच्या जागेमध्ये वसतिगृह सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
वारणाली रुग्णालयातील सुविधांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी देणार- मंत्री उदय सामंत
नागपूर, दि.20 : सांगली- मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वारणाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात विविध अत्याधुनिक सोयी -सुविधा कार्यान्वित करण्यासाठी तीन कोटी रुपये पुढील आठ दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
यासंदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. सामंत म्हणाले की, वारणाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या वाढीव कामाकरिता महानगरपालिकेने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2024-25 च्या कृती आराखड्यामध्ये रुपये तीन कोटी एवढ्या रकमेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्याकडे सादर केला आहे. हा निधी प्राप्त करून घेण्यासाठी महानगरपालिकेकडून पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
ठाणे मनपा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई – मंत्री उदय सामंत
नागपूर, दि. 20 : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथील 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर नियुक्त करण्यात आलेल्या आयुक्त, आरोग्य सेवा मुंबई यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचा गोपनीय अहवाल शासनास प्राप्त झाला असून हा अहवाल पटलावर ठेवण्यात येईल. यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
यासंदर्भात सदस्य अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य निरंजन डावखरे, सचिन अहीर आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील महानगरपालिकेच्या रुग्णालयात वैद्यकीय सेवेशी निगडित अत्यावश्यक पदे तातडीने भरण्याबाबत तसेच औषध पुरवठा नियमितरित्या उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांतील रुग्ण सेवेची निकड, लोकसंख्या तपासून वेळोवेळी श्रेणीवर्धन करण्यात येते. तसेच रुग्णालयासाठी अधिकारी व कर्मचाऱी यांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मार्फत पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे रुग्ण सेवेमध्ये कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही.