भारतीय कुस्तीला ऑलिम्पिक स्पर्धेत चमकावणारी महिला पैलवान साक्षी मलिक हिने कुस्तीला रामराम ठोकण्याची घोषणा आज केली आहे.
साक्षी मलिक आज माध्यमांशी बोलताना भावूक झाली होती. तिचा कंठ दाटून आला होता तिने देशवासीयांचे आंदोलन करताना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. ती म्हणाली की, ‘आम्ही जिंकू शकलो नाही. आम्ही आमची लढाई शेवटपर्यंत लढली.मात्र ज्या बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करत, तब्बल 40 दिवस दिल्लीत आंदोलन करुनही, जर त्यांच्याच माणसाची नियुक्ती महासंघाच्या अध्यक्षपदी विराजमान होत असेल, तर कुस्तीला रामराम ठोकलेला बरा, असे तिने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांची राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
साक्षी मलिकसह आघाडीच्या कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत आंदोलन केले होते.देशभरातून विविध स्तरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला होता.पण बृजभूषण यांच्या विश्वासू संजय सिंह यांचा विजय झाल्यानंतर मात्र साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांनी कुस्ती कायमची सोडण्याचा निर्णय घेतला आहे.