ओमिक्रॉनचा नवा उपपक्रार असलेल्या ‘जेएन.१’चा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असला तरी मागील महिनाभरापासून राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यामध्ये मागील चार आठवड्यांमध्ये म्हणजेच २४ नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल १०२ रुग्ण सापडले आहेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत चार पटीने वाढ झालेली दिसत आहे.
दरम्यान आता सांगली, कोल्हापूरसह सिंधुदुर्गातही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागरिकांनी गर्दीत जायचे टाळावे तसेच आवश्यकता असल्यास मास्कचा वापर करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी तीन वाजता बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी ही बैठक बोलावली असून सगळे जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिका आरोग्य प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य मंत्री अलर्ट मोडवर आले आहेत.