आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी. गीताजयंती. ५ हजार वर्षांपूर्वी योगेश्वर कृष्णांनी याच दिवशी अर्जुनाला गीता सांगितली. कुठे? युद्धभूमीवर. का सांगितली? तर अर्जुन आप्तस्वकीयांबरोबर युध्दाला तयार नव्हता. त्यात त्याचे पितामह भीष्माचार्य होते. गुरू द्रोणाचार्य होते. बंधु होते. मेव्हणे होते. पुतणे होते. या सगळ्या आपल्याच माणसां बरोबर युध्द करणे ही कल्पना त्याला सहन होत नव्हती. आप्तस्वकीयांना मारून रक्तलांछित सिंव्हासनावर बसणे ही गोष्ट त्याला पटत नव्हती. अर्जुन मोहात अडकला होता.
वास्तविक कौरवांनी पांडवांवर लहानपणापासून खूप अन्याय केला होता. भीमा ला कपटाने वीष पाजून बेशुद्ध केले आणि नदीत फेकून दिले. खांडववनासारखी ओसाड माळरानासारखी जागा रहाण्यासाठी दिली. जुगारात कपटाने हरवले आणि बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा ठोठावली. ती भोगून आल्यावर आतातरी पांडवांना आपल्या हक्काची भूमी मिळावी अशी भूमिका पांडवांनी आणि श्रीकृष्णांनी मांडली. पण सुईच्याअग्रावर मावेल एवढी ही जमिन मिळणार नाही अशी भूमिका दुर्योधनाने मांडली. खर तर धृतराष्ट्र राजा होता. पण तो हा अन्याय पहात स्वस्थ बसला.
भीष्म द्रोणाचार्य दुर्योधनाच्या विरोधात गेले नाहीत. विदुर शिष्टाई झाली. कृष्ण शिष्टाई झाली. पण दुर्योधनाने युध्दाची भाषा केली. राज्य जिंकून घ्या असे म्हटल्याने युद्धाला पर्याय नव्हता.
युध्दाची दोन्ही बाजूंनी तयारी झाली. सैन्य जमले. हत्तीदळ, , घोडदळ, रथ सगळ सज्ज होत. दोन्ही बाजूंनी युध्दाची सूचना म्हणून शंख फुंकले गेले. आणि अशावेळी अर्जुन युध्द करणार नाही म्हणून धनुष्य बाण टाकून रथातून खाली उतरला. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केला तो उपदेश म्हणजे श्रीमद्भगवद्गीता. तो उपदेश फक्त अर्जुनालाच नाही तर सगळ्या मानव जातीसाठी मार्गदर्शक ठरला.
गीता ग्रंथ हा भारतीयांचा आधारभूत ग्रंथ आहे. ती आमची माता आहे. जन्मदात्री माता, भारतमाता, गोमाता, भूमाता तशी गीता माता. ती आम्हाला आदर्श जीवन कसे जगायचे ते शिकवते.
भगवंतांनी अर्जुनाला त्याचा स्वधर्म सांगितला. अर्जुन क्षत्रिय होता. युध्द हा त्याचा स्वधर्म होता. त्याचे ते कर्तव्य होते. ते त्याला टाळता येणार नाही असे सांगून भगवंतांनी तुम्हा आम्हा सर्वांनाच स्वधर्म सांभाळणे, आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म चोख करणे ही कर्मरुपी फुलांनी केलेली ईश्वराची पूजाच आहे हे सांगितले.
आम्हांला प्रपंचात अनेक प्रश्न पडतात. योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही. कारण दुष्ट प्रवृत्तींचा विजय होताना दिसतो. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झालाय. स्त्रियांवरचे अत्याचार वाढत चाललेत. रात्रंदिवस आम्हा युध्दाचा प्रसंग असे झालेय. हे युध्द मनात चाललेले असते. मनातल्या सगळ्या प्रश्र्नाची उत्तरे आपल्याला गीता माता देते.
आमचे स्वातंत्र्य सैनिक रामप्रसाद बिस्मिला, वासुदेव बळवंत फडके, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू हे जिवाची पर्वा न करता स्वातंत्र्य लढ्यात उतरले. ज्यांना फाशीची शिक्षा झाली ते गीतेची प्रत हातात घेऊन हसत हसत फाशी गेले. ” देह विनाशी आहे, आत्मा अमर आहे ” हे गीतेचे तत्वज्ञान त्यांनी पचवले होते. गीता आमच्यावर ओढवलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे आम्हाला बळ देते. धैर्य देते. मन चंचल आहे ते कसे जिंकायचे ते शिकवते. सकस सात्त्विक आहाराने आणि नियमित व्यायामाने आपले आरोग्य आपण उत्तम राखू शकतो हा संदेशही गीता देते.
उध्दरेत आत्मनात्मानम् ” म्हणजे ” तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” हा संदेश तर शाळकरी मुल, गृहिणी, अगदी सगळ्यांनाच मार्गदर्शक आहे. आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे, आत्मिक उन्नती साधली पाहिजे हे गीता अगदी ठासून सांगते.
बॅ. सावरकर गीतेच्या आधारानेच मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतात, ” अनादी मी अनंत मी अवध्य मी भला ” …
आज पाच्श्रात्य देशात गीतेचा प्रसार होतोय. आपल्याकडे शाळेतल्या मुलांना हा विषय सक्तीचा ठेवला तर तरूण पिढी खूप सकारात्मक होईलच पण आपल्या संस्कारांचे महत्व त्यांना नक्की पटेल. हा दिवस येईल अशी आशा करूया.
हरि: ॐ तत्सत् |
विजयाताई सबनीस, कराड
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र