यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||
सुमारे ५००० वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी आपला भक्त व परममित्र अर्जुन याला कुरुक्षेत्रावर एकादशीच्या दिवशी भगवत गीता सांगितली. तेव्हापासून ही एकादशी “गीता जयंती ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ठिकठिकाणी भगवत गीतेतील १८ अध्यायांचे मनोभावे वाचन केले जाते.
भगवद्गीतेला “गीतोपनिषदही” म्हणले जाते. गीता ही वैदिक ज्ञानाचे सार आहे तसेत वैदिक साहित्यातील एक महत्वपूर्ण “उपनिषद” आहे.
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् |
विवस्वान्मनवे प्रहार मनुरिक्ष्वाकवे$ब्रवीत ||
एवं परम्परा प्राप्तमिमं राजर्षयो विदु: |
स कालेनेह महता योगो नष्ट: परन्तप ||
स एवायं मया ते$द्य योग: प्रोक्त: पुरातन:|
भक्तो$सि मे सखा चेति रहस्य ह्येतदुत्तमम् ||
इथं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, ही भगवद्गीता आधी सूर्यदेवाला सांगितली आणि सूर्यदेवाने मनूला, मनूने इक्ष्वाकूला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार, एक प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्याने याप्रमाणे चालत आली. ही परंपरा लुप्त झाल्यामुळे ती पुन्हा सांगावी लागली ती अर्जुनाला कुरुक्षेत्र ह्या युध्दभूमीवर.
ही गीता अर्जुनाला सांगण्याचे कारण म्हणजे तो परम भक्त आणि मित्र आहे.
श्रीकृष्णांकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परं ब्रह्म म्हणून स्वीकारले. तेंव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले, भगवद्गीता ही भक्तीभावाने स्वीकारली पाहिजे तरच ती कळेल. तेव्हा तू कुरुक्षेत्रावर समर्थपणे उतरु शकशील. भगवद्गीता हे रहस्य आहे. अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानवजातीचा उध्दार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. अर्जुनाला कुरुक्षेत्रावर युध्द करण्यामध्ये अडचणी येत होत्या त्या दूर करण्यासाठी भगवद्गीता सांगितली.
अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलिकडे होता. परंतु कुरुक्षेत्रावर त्याला जाणूनबुजून अज्ञानात टाकले गेले जेणेकरून तो जीवनाच्या समस्यांबद्दल प्रश्न विचारु शकेल आणि मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करुन जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकेल.
भगवद्गीतेतील सर्व शिकवणुकीचा उद्देश चेतनेचे जागृतीकरण करणे हाच होय. म्हणूनच गीतेच्या उपदेशाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की, तू शुद्ध भावनेत स्थित झाला की नाही ?
शुद्ध भावनेत म्हणजे स्थित होणे म्हणजे भगवंताच्या आज्ञेचे पालन करणे होय. हे विचारले कारण कुरुक्षेत्रावरील युध्दभूमीमध्ये सर्वप्रथम आपण लढू नये असे अर्जुनाने ठरविले होते. हा त्याचा स्वत:चा निर्णय होता. अर्जुनाने भगवंतांना सांगितले की, स्वत:च्या नातलगांना ठार मारुन राज्य करण्याची, उपभोगण्याची आपली इच्छा नाही. हा निर्णय शारीरिक स्तरावर आधारीत होता. कारण तो स्वत:ला शरीरच समजत होता आणि त्याचे भाऊ, भाचे, पुतणे, मेहुणे, आजोबा हे देहसंबंधी होते. म्हणून अर्जुनाला आपल्या शारिरीक गरजांची पूर्ती करणे आवश्यक आहे असे वाटत होते. अर्जुनाचा हा दृष्टिकोन बदलण्यासाठीच श्रीकृष्णांनी भगवद्गीता कुरुक्षेत्रावर सांगितली. सरतेशेवटी अर्जुन जेंव्हा सांगतो की, करिष्ये वचनं तव..’तुमच्या शब्दाप्रमाणे वागेन’, तेंव्हा अर्जुन श्रीकृष्णाच्या मार्गदर्शनानुसार युद्ध करण्याचा निर्धार व्यक्त करतो. “यद् गत्वा न निर्वतन्ते तद् धामं परमं मम्”.
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्ध च |
मय्यार्पितमनोबुध्दिर्मामेवैष्यस्यसंशय: ||
” श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,” तू नित्य माझे कृष्ण रुपामध्ये चिंतन करुन युद्ध करण्याच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजेस. तुझे कार्य मला अर्पण केल्यामुळे आणि मन व बुद्धी माझ्यावर केंद्रित केल्यामुळे तू नि:संदेह माझी प्राप्ती करशील.
श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगतांना की, कोणतीही अव्यवहार्य गोष्ट कर सांगत नाहीत, तर त्याला कर्माचे महत्व सांगतात. कर्तव्याचे पालन करायला सांगतात कारण तो योद्धा आहे.
श्रीकृष्णांनी युद्धत्याग करण्यापासून परावृत्त करतांना योगपध्दत समाजावून सांगितली जी अवघड होती. “अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे मधुसूदना ! ज्या योगपद्धतीचे वर्णन तुम्ही केले आहे, ते अव्यवहार्य आणि असह्य वाटते कारण, मन हे चंचल आणि अस्थिर आहे”.
तेंव्हा, श्रीकृष्ण समजवून सांगतात, अर्जुना, तू क्षत्रिय असल्यामुळे युद्ध टाळू शकत नाहीस. हे युद्ध अटळ आहे त्यामुळे मी तुझे सारथ्य करतोय. तुझी सर्व पापकर्मांतून मुक्तता करीन. याबद्दल तू भय बाळगू नकोस. असं म्हणत अर्जुनाला युध्द करण्यास तयार केले.
ही भगवद्गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर एकादशीच्या दिवशी सांगितली. म्हणून गीता जयंती ही मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. त्या दिवशी गीता पठण होते.
एको मन्त्रस्तस्य नामानि- एकच मंत्र, एकच प्रार्थना असावी ती म्हणजे,” हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे | हरे राम हरे राम राम राम हरे हरे “|
-सरिता ( पृथ्विजा) सुरेश कुलकर्णी. डहाणूकर कॉलनी, पुणे.
8805322148
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे