“हिंदू तन मन हिंदू जीवन
रग रग हिंदू मेरा परिचय ”
असे अभिमानाने म्हणणाऱ्या एका महान व्यक्तिमत्त्वचा जन्मदिन ,ज्याने पोखरण येथे जमिनीखालील अणूचाचणी घेऊन भारत एक शक्तिशाली देश आहे अशी ओळख जगाला करून दिली.एक असे व्यक्तिमत्त्व ज्याने पाकिस्तान कडे मैत्रीचा हात फैलावला, समझोता करण्यासाठी लाहोरपर्यंत बस सेवा चालू केली . एक कवी मनाचे व्यक्तिमत्त्व ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.
मध्यप्रदेशातील ग्वालीयर गावातील शिक्षकाच्या घरी 25 डिसेंबर 1924 रोजी अटलजींचा जन्म झाला. राजनीती विज्ञान व विधी शास्त्र या विषयांचे त्यांचेपदवी शिक्षण चालू होते पण भारत पाकिस्तान फळणी मुळे शिक्षण अर्धवट राहिले.
1939 मध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क झाला. 1944 पर्यंत संघाच्या प्रशिक्षण शिबीरात त्यांचा सहभाग होता.
1942 सालापासून त्यांनी पत्रकारिता सुरू केली. दिन दयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रधर्म या मासिकाचे व पांचजन्य या साप्ताहिक साठी त्यांनी काम केले.1947 सालापासून त्याच्या प्रचारकीय जीवनाला सुरवात झाली. उत्तरप्रदेश मध्ये प्रचारक म्हणून गेले व संघ विस्तार काम केले. काही काळ तुरुंगवास ही त्यांनी भोगला . त्याकाळात त्यांनी अनेक कविता लिहिल्या.
1951 मध्ये ते भारतीय जनसंघामध्ये सामील झाले.तेथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. नऊ वेळा लोकसभा व दोनवेळा राज्यसभेवर ते निवडून गेले जवळजवळ 40 वर्षे त्यांनी सांसद म्हणून काम केले. त्यात 2वेळा त्यांची पंतप्रधान पदी निवड झाली.
पंतप्रधान असताना त्यांनी दुसरे परमाणु परीक्षण पोखरण मध्ये घेतले. जागतिक निर्बंध असूनही त्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली अणूचाचणी घेतली .जगाला शक्तिशाली भारताची नव्याने ओळख करून दिली. राजकीय संबंध सुधारण्यासाठी लाहोर बस सुरू केली व स्वतः त्या बसमधून प्रवास करून ते लाहोरला गेले.
1999मध्ये अतिशय कठीण परिस्थितीत कारगिल युद्ध जिंकले. त्यांनी अजून एक मोठे काम केले ते म्हणजे सुवर्ण चतुष्कोन — राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे काम. ज्यामुळे भारतभरात रस्त्यांचे जाळे विणले गेले. ज्याच्यामुळे प्रवास कमीवेळात होऊ लागला.व्यापारासाठी ते फायदेशीर ठरले.त्यांनी अशा भारताचे प्रतिनिधित्व केले ज्या देशाची संस्कृती 5000 वर्षे जुनी आहे पण पुढील 1000 वर्षात येणाऱ्या आव्हानाला तोंड देऊ शकेल.
राष्ट्रासाठी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना 1992 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने संमानीत केले गेले.
1994 मध्ये उत्कृष्ठ सांसद म्हणून निवड झाली.लोकमान्य टिळक पुरस्कार ही त्यांना दिला गेला.
त्यांनी लिहिलेल्या कविता ‘ मेरी इक्यावन कविताए ‘ ह्या कविता संग्रहातून प्रसिद्ध झाल्या आहेत.
मेरी संसदीय यात्रा चे 4 भाग ,न्यू डाईमेशन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसिज ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
असे व्यक्तिमत्त्व जे राष्ट्रीय नेता,प्रखर राजनीतीज्ञ,निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता, सशक्त वक्ता, कवी, साहित्यिक, पत्रकार म्हणून नावारूपाला आले त्या अटल बिहारी वाजपेयी यांची आज 99 वी जयंती.
त्यांच्या कार्यपद्धतीला स्मरून हा दिवस आपण सुशासन दिवस म्हणून साजरा करतो
हजारो लाखों ना प्रेरणा देऊन १६ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
( गूगल च्या साहाय्याने )
सौ. सुषमा सुरेंद्र काळे
कराड
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र