२६ डिसेंबर हा वनवासी कल्याण आश्रमाचा स्थापना दिन आणि कल्याण आश्रमाचे संस्थापक श्री. . बाळासाहेब देशपांडे यांचा जन्मदिनही. अमरावतीत जन्म झालेले बाळासाहेब,प.पू. डॉक्टर हेडगेवार यांच्या सहवासात आले. तसेच रामकृष्ण मिशनच्या कार्याशी पण त्यांचा संपर्क आला. वकिली पूर्ण केल्यावर त्यांनी रामटेकला मामांबरोबर व्यवसाय सुरु केला.
दुसऱ्या महायुध्याच्या काळातही “चलेजाव “ चळवळीत भाग घेत त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला . स्वातंत्र्य प्राप्तीनंतर जशपूरला मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवले गेल्यामुळे ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या राष्ट्रविरोधी शक्तींना तोंड देण्यास गांधीवादी समाजसेवक ठक्करबाप्पांच्या सल्यानुसार सरकारने त्यांची नेमणूक केली. त्यांनी एका वर्षात १०८प्राथमिक व १५ पूर्व माध्यमिक विद्यालये स्थापन करून अपेक्षेपेक्षा अनेक पटीने कार्य केले. पण ख्रिश्चन मतांच्या लोभाने या कामास मिळणारी मदत बंद झाल्यावर श्री गुरुजींनी ही इष्टापत्तीच आहे असे म्हणत लोकसहभागातून हे काम उभे केले. त्यासाठी बाळासाहेबांनी आपली सरकारी नोकरी सोडली .
२६ डिसेंबर १९५२ ला जशपूरच्या राजांनी दिलेल्या दोन खोल्यात सहा वनवासी बालकांचा छात्रावास सुरु झाला. आणीबाणीच्या काळात अनेक महासंकटांना तोंड देऊन,कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेऊन १९७७साली आणीबाणी लादणाऱ्यांचा पराभव झाल्याने ती उठल्यावर कल्याण आश्रमाचा जोरदार रौप्यमहोत्सव साजरा केला व या कामाला अखिल भारतीय स्वरूप दिले. बाळासाहेबांच्या सेवा कार्यात त्यांची सर्व कुटुंबीय मंडळी सामील झालेली आहेत .
आपल्या स्वातंत्र्य लढ्यात राघोजी भांगरे, हुतात्मा नाम्या कातकरी ,बिरसा मुंडा,रानीमा गाई देंल्यू . झलकारी बाईसारख्या अनेक क्रांतीकारकांनी मोठा वाटा उचललेला आहे.छत्रपतींच्या सैन्यातही अनेक वनवासींचा सहभाग होताच.
आता कल्याण आश्रमाच्या श्री .चैतराम पवारांनी बारीपाडयाचे नाव आंतरराष्ट्रीय नकाशावर पोहोचवले आहे. कोणतीही सरकारी मदत न घेता पण अनेक उत्तम पायंडे पाडत आदर्श पाडा उभा केला आहे.
कल्याण आश्रमातर्फे घेतल्या जाणाऱ्या खेलकूद या स्पर्धेतून कविता राऊत, ताई बामणे सारखे खेळाडूं आपल्याला मिळाले आहेत.
रानभाजी महोत्सवांतून अनेक नवनव्या उपयुक्त औषधी भाज्यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचत आहे. वनवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव हितरक्षेच्या माध्यमातून तर श्रद्धा जागरणातून त्यांचे उत्त्सव व सण यांचे महत्व पटवून दिले जाते.
अनेक संकटांशी मुकाबला करत अशा या कामाचा वेलू गगनावर चढत असताना आज महाराष्ट्रात ७ वसतिगृहे ,३ शाळा २६ बालसंस्कार केंद्रासह ८ ग्रामविकास प्रकल्प ,८५ बचत गट असून ८७८ आरोग्यरक्षक आहेत. तसेच २० खेळकेंद्र १०९ श्रद्धा जागरण केंद्रे चालवणारे २० पूर्णवेळ ,३४ अंशकालीन कार्यकर्ते ११४२ प्रकल्प राबवत आहेत . विविध १४ आयामांच्या माध्यमातून त्या सर्व लोकांना सक्षमपणे उभे केले जात आहे .
सर्वानी या कामात शक्य तेवढे समयदान देत सहभागी व्हावे.वसतिगृह, पाड्याना,भेट देऊन वनवासी व शहरवासी यांच्यातील दरी संपवून, समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेत आपल्या राष्ट्राचे अखंडत्व राखण्यात आपणही आपली खारीची भूमिका नक्कीच उचलू या
सौ ज्योती केशव कुलकर्णी , मैत्रेयी शाखा कराड
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र