ता. २६ डिसेंबर हा दिवस म्हणजे वनवासी कल्याण आश्रमाचे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांची जयंती
स्व. बाळासाहेब धार्मिक, आध्यात्मिक वृत्तीचे होते तसेच चांगले ज्योतिषी होते. जीवनाबद्दलचा दृष्टिकोन अतिशय कर्तव्यपरायण होता, वृत्ती निरपेक्ष होती.
त्यांनी लावलेल्या वनवासी कल्याण आश्रम नावाच्या वृक्षाला खूप उत्तम रीतीने वाढविले होते. नुसतेच वृक्षारोपण न करता त्या वृक्षाची पाळेमुळे खोल रुजतील याची काळजी घेतली होती. एकेक करून त्याच्या फांद्या बहरून मोठ्या होताना पाहिल्या होत्या.
कधी कधी ते आपल्या सहकाऱ्यांना जुन्या आठवणी सांगत असत. जशपूरपासून ४० कि.मी. अंतरावर कुनकुरी येथे पंडित रविशंकर शुक्ल यांना तेथील लोकांनी काळे झेंडे दाखविले होते. या प्रसंगाने सर्व जण खूप चिंतेत होते. मोठ्या प्रमाणावर धर्मांतर आणि मतांतर झाले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शिक्षणाचा गंध नसलेल्या लोकांच्या भोळेपणाचा मिशनरी लोकांनी खूपच फायदा घेतला होता. परिस्थिती गंभीर होती. यावर तातडीने उपाय शोधणे गरजेचे होते.
रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामीजी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजी आणि त्यांच्या समवेत अनेक विचारवंतांनी यावर उपाय शोधायचे ठरवले. यासाठी हे ध्येय ठेवून एक सक्षम संघटना असणे खूप आवश्यक आहे, असे सर्वांना वाटू लागले ज्यामुळे या क्षेत्रात राष्ट्रीय जनजागृतीचे कार्य करता येईल. यासाठी विचार विनिमय सुरू झाला. याबाबत येथील राजा विजय भूषणसिंह जूदेव यांची पण मोठी साथ होती. या कार्यासाठी नागपूरचे वकील श्री. बाळासाहेब देशपांडे यांची नियुक्ती करण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे बाळासाहेब जशपुरला यायला निघाले. त्याकाळी रस्ते चांगले नव्हते, नदीवर पूल नव्हते आणि प्रवासात रात्री बसमध्येच, बसच्या स्टाफबरोबर बाळासाहेबांना थांबावे लागले.
पुढचा प्रवास कठीण आहे हे लक्षात घेऊन जशपुरच्या राजाने 45 किलोमीटर आधी कुनकुरी स्वर्णरेखा नदीजवळ आपला हत्ती पाठवला. पहिल्यांदाच बाळासाहेबांनी हत्तीवर बसून प्रवास केला आणि जशपूरला पोहोचले. राज परिवाराने त्यांचे जशपूरमध्ये स्वागत केले.
पुढील काही काळ नेत्यांच्या व विचारवंतांच्या अनेक बैठका झाल्या व हे संघटन कशा स्वरूपात असावे यावर चर्चा झाली. कामाचे स्वरूप काय असावे ज्यामुळे जनजाती समाजाच्या कल्याणाला वेग येईल याचा विचार होत होता. नाव काय असावे असा विचार होता. कल्याण आश्रम नाव सर्वांना योग्य वाटत होते. अशी सर्व प्राथमिक चर्चा झाली व 26 डिसेंबर या बाळासाहेबांच्या जन्मदिनी ही संस्था सुरू करण्याचे ठरले. जागेचा प्रश्न जशपुर नगरच्या राजा विजय भूषणसिंह जूदेव यांनी सोडवला. त्यांच्या महालामधील काही जागा त्यांनी कल्याण आश्रमासाठी दिली.
घटना 1960 सालची आहे. जुन्या राजमहालाच्या एका दालनात कीर्तन भवन होते. तेथे रोज प्रार्थना होत असे. एक दिवस प्रार्थना झाली आणि सर्व विद्यार्थी व शिक्षक दालनामध्ये बोलत उभे होते. तेवढ्यात आकाशातून एक विमान जात असल्याचा आवाज आला व कुतूहलाने सर्वजण त्या दालनाच्या, पोर्चच्या बाहेर प्रांगणात आले. शेवटचा विद्यार्थी बाहेर प्रांगणात येऊन पोहोचला व काही क्षणात तेथील दालनाचे छत कोसळले पण सर्व लहान मुले, विद्यार्थी, शिक्षक सुखरूप असल्याचे पाहून बाळासाहेबांना अतिशय समाधान वाटले. या प्रसंगाने प्रथम सर्वांनाच भीतीचा धक्का बसला, पण बाळासाहेबांनी याला ईश्वरी संकेत मानले. त्यांनी असा विचार केला की हे कार्य ईश्वरी कार्य आहे म्हणूनच आपण सर्वजण यातून सुखरूप बाहेर आलो. पुढे हाच विश्वास त्यांच्या मनात पक्का रुजला व हे ईश्वरी कार्य खूप जोमाने सुरू झाले. आजही कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते हे कार्य ईश्वरी कार्य आहे, असेच मानतात.
अनेक अडथळे पार करत काम जोमाने सुरू होते. हळूहळू समाजातील विविध स्तरांतून व जनजाती समाजातून अनेक कार्यकर्ते या कार्याशी जोडले जात होते. योग्य नियम बनविले जात होते. पायाभरणी अतिशय उत्तम झाली होती. म्हणूनच हे कार्य गेली सत्तर वर्ष उत्तम रीतीने पार पडत आहे.
काळाच्या ओघात शरीर थकत चालले असल्याचे बाळासाहेबांना जाणवू लागले होते. हळूहळू त्यांच्या शब्दात ते व्यक्त होऊन लागले होते. जणू काही त्यांना पैलतीर दिसू लागला होता. मार्च 1995 मध्ये त्यांनी त्यांचे सहकारी मा. भीमसेन चोपडा यांना फोन केला व भेटायला बोलावले. श्री. चोपडा यांनी अक्षय तृतीया झाल्यावर येतो असे सांगितले, पण बाळासाहेबांनी आग्रह केला की तोवर खूप उशीर होईल. आता लवकरच या व ते आलेसुद्धा.
बाळासाहेबांचे सुपुत्र श्री. दीपक दादांनी याबाबत आपली आठवण सांगितली, की आश्चर्य म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी ते व श्री. कृपाप्रसादजी यांनी श्रीप्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर बाळासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन केले होते.
या थोर, महान वनयोगी स्वर्गीय बाळासाहेबांबद्दल किती लिहू तेवढे कमीच आहे .
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना शत शत नमन.
▪️ मोहिनी पाटणकर, जनजाती/वनवासी कल्याण आश्रम
सौजन्य – विश्व संवाद केंद्र ,पुणे