उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक यांची देवगिरी बंगल्यावर गुप्त बैठक झाली असल्याचे वृत्त समोर आले आहे.
तब्बल तासभर ही बैठक सुरू होती असे सांगण्यात आले आहे.नवाब मलिक यांना महायुतीत सामावून घेण्यावरून हिवाळी अधिवेशनात प्रचंड वाद निर्माण झाला होता. मलिक महायुतीत नकोत,अशी भूमिका भाजपने घेतली असून त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी मलिक यांची कन्या सना मलिकही सोबत होती. मलिक बैठकीतून निघून गेल्यानंतर प्रफुल्ल पटेल देवगिरीवर दाखल झाले. या भेटीबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मलिक यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला
मलिकांना महायुतीत घेण्याबाबत अद्याप अजित पवारांनी आपली कोणतीच भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मात्र भेटीनंतर राजकीय समीकरणे बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.