लोकप्रिय तमिळ अभिनेते व डीएमडीके पक्षाचे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
त्यांच्या निधनाच्या एक दिवसाआधी पक्षाने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट शेअर करून विजयकांत यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली होती. विजयकांत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे असे त्या पोस्टमध्ये म्हंटले होते.
तामिळनाडूच्या राजकारणातील एक महत्वाचा चेहरा म्हणून ओळखले जात असत. ते पक्षाचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष होते.२०११ ते २०१६ दरम्यान विरोधी पक्षनेते पदावर त्यांनी काम केलं आहे. तसेच टॉलिवूडमधील ते एक लोकप्रिय अभिनेते असून .१५४ सिनेमांत त्यांनी काम केले होते.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी विजयकांत यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.