पुणे महानगर समिती १ ते १५ जानेवारी दरम्यान ११ लाख घरी संपर्क करणार
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने घरोघरी जाऊन श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत संपूर्ण शहरभरात ११ लाखांहून अधिक घरात हे गृहसंपर्क अभियान होणार आहे.
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, पुणे महानगर समितीतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाच्या पुणे महानगर समितीचे संयोजक प्रसाद लवळेकर, सहसंयोजक अभिजित बर्वे, विश्व हिंदू परिषद पुणे महानगर पूर्व भाग मंत्री धनंजय गायकवाड, पुणे महानगर पश्चिम भाग मंत्री प्रदीप वाझे यांनी ही माहिती दिली. या निमित्ताने संपूर्ण देश पुन्हा राममय व्हावा, या हेतूने श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासातर्फे, पुणे महानगर समितीने हे अभियान आयोजित केले आहे.
Tags: NULL