१ जानेवारी १८१८ रोजी घडलेली कोरेगाव भीमाची लढाई हे जातीचे युद्ध होते का? हे युद्ध महार विरुद्ध पेशवे होते ? ऐतिहासिक तथ्य बघता ही जातींची लढाई नव्हती. ब्रिटिशांचे या लढाई संदर्भातील अनेक नोंदी, पत्र, अहवाल व समकालीन कागदपत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात ब्रिटिशांनी या लढाई ला कुठेही जातीचे किंवा जातीय अस्मितेसाठी ची लढाई म्हटलेले नाही.
या लढाईत इंग्रजांकडून लढलेल्या एकूण ७७५ संख्येच्या सैन्यात मराठा, महार, गुजर, मुस्लिम, मीना,अहिर, शीख, पठाण, बलोची, राजपूत इत्यादी समूहाचे सैनिक होते.
या लढाईत मराठ्यांकडून लढलेल्या सैन्यात रामोशी, मांग, भिल्ल, मराठा, अरबी मुस्लिम व इतर अनेक जाती जमातीतील सैनिक होते. कोरेगावात इंग्रजांविरुद्ध लढलेल्या तुकडीत सगळयात जास्त संख्या अरबी मुस्लिम सैनिकांची होती.
ब्रिटिशांकडून या लढाईचे नेतृत्व कोणीही भारतीय सैनिकाने केलेले नसून कॅप्टन स्टॉंटन या ब्रिटिश अधिकाऱ्याने केले होते.
ब्रिटिशांच्या विरोधात भारतातील बिरसा मुंडा पासून क्रांतिगुरु लहुजी साळवे अशा अनेक जनजाती, जातींनी, व्यक्तींनी संघर्ष केला व शौर्य गाजवले. त्यामुळे कोणत्याही जाती-जमातीचे शौर्य नाकारण्याचे काही कारण नाही.
मागील दोन वर्षांपासून कोरेगाव भीमा येथील जय स्तंभावर सजावट करताना “महार रेजिमेंट” चा लोगो ची प्रतिकृती लावली जाते. पण १८१८ ला महार रेजिमेंट अस्तित्वातच नव्हती. १९४१ ला महार रेजिमेंट ची स्थापना झाली. या रेजिमेंट चे नाव जरी महार असले तरी अगदी ब्राह्मण, मराठा…असे विविध जातीचे, धर्माचे लोक या रेजिमेंट मध्ये कार्यरत आहेत.
ब्रिटिशांनी त्यांच्या लष्करात अस्पृश्य सैनिकांना भरती बंद केली होती. ती बंदी उठवावी म्हणून त्या बंदी विरोधात १ जानेवारी १९२७ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोरेगाव भीमा जयस्तंभास फक्त एकदाच भेट दिली होती.
या लढाईनंतर बांधलेल्या जयस्तंभाचे (लष्करी स्मारकाचे) इन-चार्ज म्हणून इंग्रजांनी या लढाईत शौर्य गाजवलेल्या मराठा जातीतील खंडोजीबीन गाजोजि
माळवदकर यांची नेमणूक केली. आजही त्यांचे वंशज त्या ठिकाणी आहेत. सध्या ऍड रोहन माळवदकर हे सातवे वंशज आहेत ज्यांनी या युद्धा संदर्भात तथ्यपूर्ण पुस्तक लिहले आहे.
आज रोजी जयस्तंभ खाजगी जागेत आहे, या जागेचा वाद सध्या कोर्टात सुरू आहे. १ जानेवारी ला जयस्तंभ परिसरात कार्यक्रम घेण्यासाठी राज्यसरकार ला कोर्टाची परवानगी घ्यावी लागते.
२०१८ पर्यंत जयस्तंभला कधीही न गेलेले काही राजकारणी आता मात्र मतांच्या राजकारणासाठी जाऊन डोकं टेकवतांना दिसतात.
२०१८ नंतर ‘वंचित बहुजन आघाडी’ मुळे मतांचे ध्रुवीकरण झाल्याने पुढे झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी ला झटका बसल्याचे स्पष्टच आहे. त्यामुळे मतपेटीसाठी राजकीय नेते व पक्ष सत्य इतिहासाकडे डोळेझाक करतो.
बार्टी (BARTI) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र ही अनुसूचित जातीतील ५९ जातींच्यासाठी कार्यरत संस्था आहे. कोरेगाव च्या जय स्तंभ व बार्टी काही संबंध नसताना. बार्टीकडे १ जानेवारी च्या कार्यक्रमाची व्यवस्थेची मोठी जबाबदारी दिली जाते. व निधी ही खर्च केला जातो.
या इतिहासाला धरून अवास्तव फुटीर मांडणी काही लोक करत आहेत. त्यामुळे जातीय तणाव वाढताना दिसतो. २०१७ च्या ३१ डिसेंबर ला जहाल कम्युनिस्ट
गटांनी एल्गार परिषफ आयोजित करून चिथावणीखोर भाषणे केली होती. त्यात अनेकांना माओवादी चळवळीशी संबंध असण्याच्या आरोपाने अटक झालेली आहे.
टोकाच्या जातीय अस्मिता कुरवळण्या पेक्षा भारतीय संविधानाला अपेक्षित समता, बंधुता व एकात्मता निर्माण होण्यासाठी सुजाण नागरिकांनी अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता आहे.
सागर शिंदे.
जय हिंद, जय भीम
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे