महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ डिसेंबर 2023 मध्ये सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी आता रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे अधिकृत वृत्त महाराष्ट्र शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी दि. २९ डिसेंबरला या संदर्भात बैठक घेतली होती. राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची यादी पाठवण्यात आली होती. यात रश्मी शुक्ला यांचे देखील नाव होते. दरम्यान, त्यांना महासंचालकपदी किंवा मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक केली जाणार या बाबत संभ्रम होता. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नेमणूक केली आहे.
रश्मी शुक्ला या पुणे पोलिस आयुक्त असतांना वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचे फोन फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करत चौकशी सुरू करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयात हा खटला दाखल झाल्यानंतर त्यांना दिलासा देत आरोपमुक्त करण्यात आले होते.