बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) संघटनेचा नेता आणि कॅनडास्थित गँगस्टर लखबीर सिंह लांडा याला भारतसरकारने दहशतवादी घोषित केले आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
2021 मध्ये मोहाली येथील पंजाब पोलिस इंटेलिजेंस मुख्यालयावर रॉकेट हल्ल्याची योजना आखण्यात तो सामील होता. मे २०२२मध्ये पंजाब पोलिसांच्या मुख्यालयावर झालेल्या रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (आरपीजी) हल्ल्यात तसेच इतर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याप्रकरणी लांडाचे नाव पुढे आले होते.या प्रकरणी त्याच्याविरोधात पंजाब पोलिस आणि एनआयएमध्ये गुन्हा दाखल आहे.
गृह मंत्रालयाने शुक्रवारी एका अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला आहे. लांडा हा पाकिस्तानमधून भारतात तस्करी केली जाणारी शस्त्रे आणि आयईडी हत्यारांची देखरेख करत होता.असेही वृत्त समोर आले आहे. लांडा हा कॅनडातील खलिस्तान समर्थकांशी देखील संबंधीत आहे. पंजाब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लांडा पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून विविध मॉड्यूल्सना इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस (IEDs), शस्त्रे, अत्याधुनिक शस्त्रे, स्फोटके पुरवतो.तसेच पंजाबसोबतच देशाच्या विविध भागात दहशतवादी माड्युल तयार करत आहे. यामध्ये खंडणी, खून, बॉम्बस्फोट, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यांचाही समावेश आहे.. एनआयएने त्याच्यावर बक्षीसही जाहीर केले आहे.