पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे उदघाटन झाले तसेच त्यांच्या हस्ते आज पुनर्विकसित करण्यात आलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे आणि वाल्मिकी विमानतळाचे देखील उद्घाटन झाले नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशातील नागरिकांना संबोधित केले . यावेळी त्यांनी देशातील जनतेला महत्त्वाचे आवाहन केले आहे. अयोध्येतील राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी दिपोत्सव साजरी करा, घराघरात दिवे लावा, त्या दिवशीची संध्याकाळ पूर्णपणे झगमगित असायला हवी असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहे. अशा प्रसंगात अयोध्येच्या नागरिकांमध्ये उत्साह असणे हे स्वाभाविक आहे. मी सुद्धा तुमच्यासारखाच उत्सुक आहे”, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.. यावेळी ते म्हणाले की, अयोध्येला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर घेऊन जायचं आहे. येत्या काळात अयोध्ये संपूर्ण उत्तर प्रदेशला दिशा दाखवेल.
देशाच्या इतिहासात 30 डिसेंबरची तारीख खूप ऐतिहासिक राहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजच्याच दिवसी 1943 मध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा जयघोषाचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्याच्या दिवशी जोडल्या गेलेल्या अशा पवित्र दिवशी आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळ संकल्पाला पुढे नेत आहोत. आज विकसित भारताच्या निर्माणाला गती देण्याच्या अभियानाला अयोध्या नगरीला नवी ऊर्जा मिळाली. आज इथे 15 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण झाले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत.
मागील 9 वर्षात भारताने पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा विश्वस्तरावर अभूतपूर्व विस्तार केला आहे त्यामुळे आता फक्त रामरायालाच नाही तर देशातील 4 कोटी लोकांना पक्की घरे मिळाली आहेत. असेही यावेळी मोदी म्हणाले आहेत.