2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळपास अशक्य’; ब्रिटिश वृत्तपत्राने केला दावा
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले असताना भाजपाला तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून कोणी रोखू शकत नसल्याचा दावा ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र ‘द गार्डियन’मध्ये एका लेखात करण्यात आला आहे.
हा लेख हॅना अॅलिस पीटरसन यांनी लिहिला असून आताचे तीन राज्यांतील विजयानंतर खुद्द पंतप्रधान मोदीही 2024 मध्ये विजयाचे भाकीत करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत असे त्यांनी म्हंटले आहे.
पीटरसन पुढे लिहितात की ‘पंतप्रधानांची लोकप्रियता आणि एक मजबूत नेता म्हणून त्यांची प्रतिमा, तसेच भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी अजेंड्यामुळे विशेषत: उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील हिंदू मतदार मोठ्या संख्येने प्रभावित झालेले दिसून येत आहेत.
2014 पासून, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर देशातील जनमत मोठ्या प्रमाणात भाजपकडे झुकले आहे.या लेखात लिहिले आहे की, ‘भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात भाजपपेक्षा विरोधी पक्ष ताकदवान आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर विरोधक विखुरलेले आणि कमकुवत दिसतात.’
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये विजय मिळवला असला तरी पक्ष अंतर्गत कलहाचा सामना करत आहे हे सत्य आहे. आणि इंडी आघाडीच्या नावाखाली विरोधी पक्षांनी युती केली असली तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही.