एकीकडे नववर्षाचे स्वागत सर्वत्र जोरात सुरु असताना आज उत्तर मध्य जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला आहे. जपानच्या हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रीफेक्चर्सच्या किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.
जपान मेट्रोलॉजिकल एजन्सीकडून आलेल्या माहितीनुसार पश्चिम जपानच्या इशिकावा आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यानंतर सागरी लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निगाटा, टोयामा, यामागाटा, फुकुई, ह्योगो किनारी परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
माहितीनुसार, वजिमा शहरात १.२ मीटर उंचीची पहिली लाट किनाऱ्यावर धडकली आहे. येत्या काळात त्सुनामीच्या आणखी लाटा किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे दाव्यानुसार ५ मीटर उंचीच्या लाटांची शक्यता आहे. त्यामुळे किनारी भागाचे नुकसान होऊ शकते.नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून सुरक्षितस्थळी जाण्यास सांगितले आहे.
त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर जपानमधील भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून इमर्जन्सी संपर्क नंबर प्रसिद्ध करण्यात आला आहे.