मागच्या भागात आपण पाहिले हा स्तंभ कोणताही प्रचंड विजय साजरा करण्यासाठी नसून या लढाईत शूरतेने लढलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला होता जे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेले होते आणि तरीही त्यांनी शत्रुसैन्याशीं निकराचा सामना केला. पण धूर्त एल्फिन्स्टनने ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गडबड करून दुहीची बीजं पेरून ठेवली होती. त्याने नक्की काय केलं होतं हे पाहूयात आज आणि उद्याच्या भागांत.
१९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून एल्फिन्स्टनला सूचना आली होती की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत जखमी झालेल्या आणि कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत. नंतर फारसीची मागणी वगळण्यात आली कारण जरी कलकत्त्यात फारसीचा वापर होत असला तरी महाराष्ट्रात फारसा वापर होत नव्हता. त्यामुळे ह्या स्तंभावर फक्त इंग्रजीत आणि मराठीत लेख आणि नावे असावीत ही सूचना मान्य केली गेली.
ह्या पोस्टसोबत कोरेगावच्या स्मारकाच्या इंग्रजी लेखाचा फोटो जोडला आहे. जिज्ञासूंनी तो नक्की पाहावा. त्याचे मराठी भाषांतर साधारणपणे असे होते:
“मुंबईकडील शिपायांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्या कॅप्टन स्टाँटन यांच्यतर्फे हा स्तंभ कोरेगावच्या रक्षणाचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे, जे १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वोत्तम आणि रक्तपिपासू अशा संपूर्ण लष्कराकडून घेरले गेले होते. कॅप्टन स्टाँटन – अतिशय धक्कादायक परिस्थिती, असाध्य विरोध आणि अजिंक्य मनोवृत्तीच्या शिपायांचे अनुमोदन, आणि शत्रूकडील अस्वस्थता यांमूळे पूर्वेकडील ब्रिटीश सैन्याने अभिमानास्पद सफलता प्राप्त केली. या शूर सैन्याची आठवण चिरस्थायी करण्यासाठी हा त्यांच्या खंबीरपणाचा गौरव आहे. इंग्रज सरकारने त्यांच्या शिपायांची आणि मारल्या गेलेल्या इतरांची, तसेच जखमी झालेल्यांची नावे सदर स्मारकावर लिहीण्याचे निर्देश दिले आहेत”. याखाली “सीम्प्सन अॅँड कर्नल लेवलीन Setrs, कलकत्ता” असे लिहीले आहे.
स्मारकावर जखमी झालेल्या आणि मारल्या गेलेल्या सैनिकांची त्यांच्या युनिटनुसार नावे आहेत. ह्या युनिटमध्ये मद्रास आर्टिलरी (तोफखाना), बॉम्बे नेटिव्ह इन्फन्टरीच्या पहिल्या रेजिमेंटची दुसरी बटालियन (पायदळ), आणि पूना ऑक्सिलरी हॉर्स (घोडदळ) ह्या तीन युनिट्सची नावे आहेत. जातीवाचक कोणत्याही युनिटचे नाव नाही हे ध्यानात घ्यावे.
स्मारकावर जखमींची फक्त १५ नावे आहेत. पण ह्या लढाईत १०८ लोक जखमी झाले होते ज्यांची नावे स्मारकावर नाहीत. कोण्या एका जातीच्या सैनिकांनी विशेष पराक्रम केला अशी कोणतीही नोंद इंग्रजी कागदपत्रात नाही. एका रजिस्टरमध्ये ह्या सगळ्या सैनिकांची नावे, त्यांचे युनिट, पद, कंपनी, हॉस्पिटलमधून डिस्चार्जची तारीख, जर उपचारादरम्यान मृत्यू आला असेल तर किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बदली झाली असेल तर तशी नोंद आहे. ह्याचबरोबर प्रत्येकाला शरीरावर नेमक्या कोणत्या आणि कुठे जखमा झाल्या होत्या ह्याचीही नोंद आहे. जिज्ञासूंनी ही यादी नक्की पाहावी. ह्यातही कुठेही जातवार नावे नाहीत ही पुन्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.
पण शेवटचा मुद्दा राहतोच. स्मारकाच्या इंग्रजी लेखात Triumph असा शब्द कोरला आहे, आणि या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. इंग्रजांनी भारतात, इथल्या लोकांकरिता ‘विजय, जय’ असा शब्द जोडून हा स्तंभ उभारला. पण एक गोष्ट नजरेसमोर आणली तर या लढाईपूर्वी झालेल्या खडकीच्या आणि येरवड्याच्या लढाईतही इंग्रजांचा विजय झालेला. यानंतरही, गोपाळ-आष्टीच्या लढाईत खुद्द पेशव्याचे सेनापती बापू गोखले मारले गेल्यानंतर व ती लढाई पेशव्याच्या हातून इंग्रजांनी जिंकून घेतल्यानंतर तर वास्तविक मोठा विजय इंग्रजांनी साजरा करायला हवा होता. या सगळ्या गोष्टी विचारात घेता, इंग्रजांची उघड वागण्याची पद्धती आणि त्यांची अंतर्गत पत्रव्यवहाराची नीती नेमकी कशी होती? पाहूया उद्याच्या भागात!
संदर्भ
‘Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818’ – by John Wylie [1839]
British Library Shelf-mark: 10057.pp.10
सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना:
आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक्षात घ्यावे.
Vidyacharan Purandare
#भीमा_कोरेगाव, भाग_६, इतिहासाच्या_पाऊलखुणा