“रामो विग्रहवान् धर्मः।”
येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील भव्य मंदिरामध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. यानिमित्ताने अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार होत आहे. प्रत्यक्षात शेकडो वर्षे रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष चालला, यामध्ये लाखो हिंदू बांधवांनी आपले प्राण अर्पिले. रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष माहित झाला तरच हे राम मंदिराची मुक्ती का स्वप्नवत वाटायची हे लक्षात येऊ शकेल.
या संदर्भातील पुस्तके, मासिके, विशेषांक, वर्तमानपत्रे तसेच निरनिराळ्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा संघर्ष मांडला आहे.
जय श्रीराम !
“रामो विग्रहवान् धर्मः।”
स्वप्नपूर्ति भव्य राममंदिर निर्माणाची :
▪️भाग – १
आपल्या धर्म आणि संस्कृतीवर परकीयांची आक्रमणे
भारत देश प्राचीन काळापासून अतिशय संपन्न व समृद्ध. तो ऐहिक दृष्टीने जेवढा संपन्न व समृद्ध होता तेवढाच धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने देखील. इसवी सनाच्या पूर्वीपासून या भूमीवर, येथील धर्म – संस्कृतीवर सातत्याने आक्रमणे होत आली आहेत. ती केवळ येथील संपत्ती लुटण्यासाठी नव्हती तर येथील धर्म व संस्कृती नष्ट करण्याचा हेतू देखील त्यामागे होता.
आपल्या देशातील अनेक मंदिरे व तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला, मग ते सोरटी सोमनाथाचे मंदिर असो की काशीचे विश्वनाथ मंदिर. मथुरेचे श्रीकृष्ण मंदिर असो की अयोध्येचे श्रीरामजन्मस्थान. परकीय आक्रमक येथील दगड – मातीपासून बनविलेल्या मंदिरांचे नुकसान करू शकले, परंतु येथील जनतेच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग असलेली धर्म – संस्कृती नष्ट करू शकले नाहीत.
इसवी सन पूर्व १५० मध्ये अयोध्येवर पहिले आक्रमण झाले ते यवन राजा मिन्यांडरचे. त्यानंतरही अनेक विदेशी आक्रमणे झाली. इसवी सन पूर्व १०० च्या सुमारास विक्रमादित्याच्या काळात अयोध्येला परत एकदा वैभव प्राप्त झाले, परंतु अयोध्येवरील व इतर तीर्थक्षेत्रांवरील परकीयांची आक्रमणे मात्र थांबली नाहीत. इसवी सन १०२५ मध्ये महमूद गझनीने उत्तर व पश्चिम भारतावर आक्रमण केले, त्याने थेट गुजरातपर्यंत धडक मारली. भारताच्या पश्चिम किनार्यावरील सोमनाथ मंदिराचा विनाश करून त्या काळात दोन कोटींची लूट त्याने सोमनाथमधून गझनीला नेली. याच महम्मूदाने काशी, मथुरा या उत्तर भारतातील तीर्थक्षेत्रांवरही हल्ले केले आणि तेथील मंदिरे उद्ध्वस्त करून प्रचंड लूट केली, हिंदूंच्या कत्तलीदेखील केल्या. पुढच्या काळात महमूद गझनीचा पुतण्या सालार मसूद याने इ. स. १०३३ मध्ये अयोध्येवर आक्रमण केले. त्यानंतर अशाप्रकारे परकीय आक्रमकांनी व मुस्लिम रानटी टोळ्यांनी सातत्याने या भूमीवरील धर्मक्षेत्रे, तीर्थक्षेत्रे यांना लक्ष्य केले व तेथे लूट करून ही तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त करण्याचाही प्रयत्न केला.
-▪️डॉ. सचिन वसंतराव लादे, पंढरपूर
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे