एका मित्राने सायको शायर नावाच्या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओची लिंक पाठवली. टायटल होतं राम ! थम्बनेलवरून कवी, सादरकर्ता डावा असेल असा अंदाज आला. या व्हिडिओचा एक रिल दिसलाच होता.
त्यातला कवी तर स्वतः परमहंस पदाला पोचल्याच्या अविर्भावात ‘तुम्हाला राम कळलाय का?’ असं विचारतोय. “जबरदस्ती के जय श्रीराम में सबकुछ है, बस राम नही” असा आरोप करून मोकळा झालाय. आजवर कुणीही, कुठेही, कुणावरही “जय श्रीराम” म्हणायला दबाव टाकला नाहीये. मागे एकदा विदूषक चौधरींनी जय श्रीराम म्हणताना कुणाच्या तरी पराजयाची कामना त्यात असते वगैरे बडबड केली होती. तर हो! आम्ही अमंगल शक्तींच्या पराजयाची कामना करतोच! आणि कामनाच करत नाही तर आपल्या विजयासाठी परिश्रमही करतो. अंधकार समोर दिसत असताना उजेडाच्या विजयाची कामना करणं गैर नाही.
मंदिर होतंय याचा इतका पोटशूळ डाव्या गोटात आहे की महाराष्ट्रातला दाढीवाला, आक्रस्ताळा, संपादक ते पत्रकार असा प्रवास करून ‘घसरण’ या शब्दाला सार्थ करणारा वामशिरोमणी रामरायांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला धर्माचं राजकारण म्हणतोय. (जाता जाता- सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण होऊ नये, अशी नेहरूंची इच्छा होती. “हिंदू पुनरूत्थानवाद” नावाचं पिल्लू तेव्हा सोडलं गेलं. राम मंदिरातला कार्यक्रम किंवा राम “राष्ट्रीय” नसून धार्मिक आहे, ही भ्रांत या पुनरूत्थानवाद या भ्रामक कल्पनेतून पडली असावी.)
दुसरा एक वेडा पीर तर वर्षभरापासूनच ‘आमचा राम विरूद्ध तुमचा राम’ अशी भातुकली मांडून बसला आहे. राम काल्पनिक, रामायणाचे पुरावे द्या, असं म्हणणाऱ्या पार्ट टाईम वकील कम खासदाराला “मेरे दिल में तो राम है” याचा साक्षात्कार झालाय.
एकूणच वैचारिक संघर्षाच्या अंतिम टप्प्यावर जग आणि विशेषतः देश असतानाच्या पार्श्वभूमीवर रामललांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. हिंदू समाज मनाचा सेक्युलरिझमचा भ्रमाचा भोपळा २०१४ साली फुटला. समाज मन बदललं आणि डावी विचारधारा सत्तेतून बाहेर गेली. जेव्हा अटलजी २२ पक्षांचं सरकार चालवत होते तेव्हाही समाज मन, मिडिया, प्रबुद्ध लोक (intellectuals) यांवर डाव्यांचा पगडा होता. इतका की सरकार एखाद्या विषयावर काय निर्णय घेणार याची माहिती आधीच मिळण्याइतका आणि ते निर्णय बदलायला सरकारला भाग पाडण्याइतका डाव्यांचा प्रभाव सर्वच क्षेत्रात होता. आज तशी स्थिती नाही. निर्णय झाल्यानंतरच बातमी कळते. आज होणारी आगपाखड त्यासाठी आहे.
बाबरी ढाचा पडल्यानंतर राम मंदिराच्या आंदोलनाने वेग घेतला. तेव्हाच दवाखाना बांधा, शाळा बांधा अशी टुमणी चालू झाली होती. असं म्हणणं तेव्हा स्टेटस सिम्बॉल होता. राम मंदिराच्या संघर्षाचा इतिहास माहित नसणारे लोक असं बरळत होते.
आज श्रीराम मंदिर न्यासाकडून पूजित अक्षता कलश गावोगावी पोचतायत. याचा उपयोग काय ? तर आमच्या इथे एका गावात राहून कधीही एकत्र न येणारे दोन समाज राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र बसले. कुठलाही विरोधी विचार मांडला गेला नाही. एकमताने निर्णय झाला
समाज मन कसं असतं? तर काल अयोध्येतून वार्तांकन करताना ज्ञानदा कदमच्या डोळ्यात अश्रू आले. पत्रकार म्हणून स्वतःची पुरोगामी इमेज ढासळल्याची चिंता तिला वाटली नाही. बदलणारं समाज मन असं आहे.
जी संघटना समाज मन जाणून समाजाला विधायक कार्यक्रम देऊ शकते, तीच संघटना समाज स्वीकारत असतो. समाजाला सतत दूषणं देऊन आम्ही काहीजणच कसे विद्वान; असं म्हणणारे नेते आणि त्यांच्या संघटना अडगळीत फेकल्या जातात.
हिंदू समाजाने सतत संघर्ष करून ५०० वर्षांनंतर आपल्यावरचा कलंक धुतला आहे. हीच भावना सोमनाथ मंदिराच्या लोकार्पणाच्या वेळी तत्कालीन राष्ट्रपती स्व. राजेंद्र प्रसाद यांनी व्यक्त केली. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ काळात प्रत्येक हिंदू घरातून रामासाठी काही तरी हातभार लागलाच असेल. आज हिंदू समाजातलं प्रत्येक मन समान आंतरिक भावनेने जोडलं गेलंय. २२ जानेवारीला देशातली ५ लाख गावं-पाडे राममय होतील. रामरंगात रंगतील.
हिंदू समाजावरचा प्रत्येक कलंक धुतला गेलाच पाहिजे. मानबिंदूंची पुनर्स्थापना झालीच पाहिजे. जगाने याला संकुचितपणा, प्रतिगामी म्हटलं तरी पर्वा नाही. मात्र मानसिक गुलामगिरीची लहानात लहान खूण पुसली गेलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही आमच्या पूर्वजांच्या स्मृतींचा जागर करू. गतवैभव पुन्हा मिळवू.
भविष्यकाळात असे सकारात्मक बदल घडतील. राममंदिर ते राष्ट्रमंदिर हा प्रवास सुरू झालाय. श्रीरामांच्याच कृपेने निश्चित पूर्ण होईल या विश्वासासह…
जय श्रीराम !
© ऋतुराज कशेळकर
#जयश्रीराम #राममंदिर_ते_राष्ट्रमंदिर
#श्रीराममंदिर #अयोध्या
सौजन्य – सोशल मिडिया